
रत्नागिरी, प्रतिनिधी : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार झाला. १८ नवनियुक्त मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी अपेक्षेप्रमाणे रत्नागिरी विधान सभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांचाही मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये समावेश झाला. सामंत यांनी राजभवनात पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रत्नागिरीत जोरदार जल्लोष केला.
एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. उदय सामंत यांच्या शहरातील जयस्तंभ येथील कार्यालयाबाहेर, तसेच मारूती मंदिर सर्कल येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणा देत हा आनंदोत्सव साजरा केला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जबाबदारी सांभाळली होती. एकनाथ शिंदे गटातही उदय सामंतांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. त्यानुसार शपथविधी होण्यापूर्वीच शहर आणि तालुक्यातील सामंत समर्थकांनी जल्लोषाची पुर्व तयारी केली होती. उदय सामंत यांनी सकाळी राजभवनात गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर सामंत यांच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयासमोरही समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा कोला. तसेच मारूती मंदिर सर्कलला सामंत समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी केली. उदय सामंत आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा अनेक घोषणा देत समर्थकांनी आनंद साजरा केला.
उदय सामंत मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी करतील याची मला खात्री आहे – उदय सामंत यांचे वडील रवींद्र उर्फ अण्णा सामंत
उदय सामंत मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी करतील याची मला खात्री आहे असा विश्वास मंत्री उदय सामंत यांचे वडील रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांनी व्यक्त केला आहे. तसेच उदय सामंत यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्याने निश्चितच आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांच्या मातोश्री यांनी व्यक्त केली आहे.
उदय सामंत यांची राजकिय कारकीर्द
उदय सामंत हे २००४ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडुन आल्यानंतर अल्पावधितच त्यांना मंत्रीपद मिळाले. २०१३ मध्ये त्यांनी नगरविकास राज्यमंत्री पदासह अन्य ९ खात्यांची जबाबदारी त्यांनी लिलया पेलली होती. जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांनी भुषविले. २०१६ ला अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. २०१८ मध्य म्हाडाचे अध्यक्ष म्हणून त्यांना संधी मिळाली. २०१९ ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्विकारली आणि लिलया पेलली. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता त्यांना खातं कोणतं मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.















