
रत्नागिरी : शिवसेनेचे उपनेते आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरीत शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून शिवसैनिकांनी पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला.
उदय सामंत यांचा शपथविधी लाईव्ह पाहण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार उदय सामंत यांच्या कार्यालयात गर्दी केली होती.
गेले काही दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होती. कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. कोकणातूनही काही नावं चर्चेत होती. त्यामध्ये दीपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत ही रत्नागिरी-सिंधुदुर्गतून चर्चेत होती. मात्र शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत यांचं नाव आघाडीवर होतं. अखेर उदय सामंत यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने शिक्कामोर्तब केलं. त्यानुसार दुपारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीत एकच जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटत, घोषणा देत जल्लोष करण्यात आला. उदय सामंत मंत्री झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकत उदय सामंत यांच्यावर जी जबाबदारी टाकलीय ती ते निश्चितपणे यशस्वीरित्या पार पाडतील असा विश्वास उदय सामंत यांचे वडील रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.















