३ हजार २१० जागांसाठी १७ हजार ३३१ उमेदवारांमध्ये लढत
मुंबई : राज्यातील १० महानगरपालिका आणि दुसर्या टप्प्यातील ११ जिल्हापरिषदा व त्याअंतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांसाठी उद्या मंगळवारी (ता.२१) मतदान होत आहे. मतदारांनी निर्भयपणे घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केले आहे.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३ हजार २१० जागांसाठी १७ हजार ३३१ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यासाठी ३ कोटी ७७ लाख ६० हजार ८१२ मतदारांसाठी ४३ हजार १६० मतदान केंद्रांची; तसेच ६८ हजार ९४३ कंट्रोल युनिट व १ लाख २२ हजार ४३१ बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर २ लाख ७३ हजार ८५९ कर्मचार्यांसह आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती सहारिया यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते.
सहारिया यांनी सांगितले की, ११ जानेवारी २०१७ रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १६ फेब्रुवारी २०१७ रोजी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. दुसर्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली होती. या जिल्ह्यातील ८ पंचायत समित्या व त्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान झाले; तर ४ पंचायत समित्या व त्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठी दुसर्या टप्प्यात मतदान होईल.वर्धा जिल्हा परिषदेच्या २ आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ६ जागांबरोबरच त्याअंतर्गतच्या पंचायत समितीच्या १६ जागांसाठीदेखील उद्या मतदान होत आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात आले नव्हते, असे स्पष्ट करून सहारिया म्हणाले की, सर्व १० महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी मतदान होत आहे. महानगरपालिकेच्या १ हजार २६८ जागांसाठी ९ हजार २०८ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ६५४ जागांसाठी २ हजार ९५६; तर पंचायत समित्यांच्या १ हजार २८८ जागांसाठी ५ हजार १६७ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजपर्यंतच मतदानाची वेळ असेल. या सर्व ठिकाणी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी मतमोजणी होईल.मतदानाचा हक्क बजवाया सर्व निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून राज्य निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी आढावादेखील घेण्यात आला आहे.