रत्नागिरी : आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीवाले विचारतात लाज नाही का वाटत, आहो पण तुमचा आणि लाजेचा काही संबंध आहे का? असा प्रति सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरे यांची गुहागर येथे जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते.
रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, रिपाई, रासप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर उमेदवार अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वाईकर, रायगडचे पालकमंत्री मंत्री रवींद्र चव्हाण, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विलास चाळके, सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि हजारो जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी ठाकरे म्हणाले काँग्रेस- राष्ट्रवादीला मी जाहीर विचारतो तुम्हाला लाज वाटते का? कारण पवार पुलोद स्थापन करून , वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले, नंतर राजीव गांधींना विरोध केला, नंतर सोनिया गांधींना विरोध केलात आणि आता परत कटोरा घेऊन काँग्रेसच्या दारात उभे आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.
आम्ही अन्यायविरोधात आम्ही दगडधोंडे हाती घेतो. मच्छिमारांचा विषय आम्ही मार्गी लावला. केंद्र सरकारने यावर मार्ग काढला. सर्व नेते प्रचारात असताना कोकणातील मच्छिमारांचे प्रश्न मार्गी लावले. एलइडी लाइटद्वारे मासेमारी केली जाते, हा भयंकर प्रकार आहे. सत्ता जनता जनार्दन सत्ता देते. त्यांचा विश्वास गमावू नको, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता. प्राण गेला तरी बेहत्तर पंरतु शब्द पडू दिला नाही. अनंत गितेवर टीका करतात. टीका करणाऱ्यांनी अनेक उद्योग सुरू केले. त्यांनी सिंचन घोटाळा केला. त्यांच्या नेत्यांनाही लोकांनी लाथा घातल्या आहेत.
येत्या पाच वर्षांत लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोकणवासीयांना जे हवे ते देण्याचे प्रयत्न केले जातील.
२५ वर्षांपासून आमची युती आहे. ती मजबूत राहणार. राममंदिराचा विषय थंड बस्त्यात पडला होता. आता हालचाली सुरू झाल्या आहेत. कोर्टाने देखील कालमर्यादा ठरवून द्यावी असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नालायक कारट्याने सावरकरांचा अवमान केला
उद्धव ठाकरेंची राहुल गांधींवर टीका
हा हिंदूस्थान आहे. इटली नाही. राहुल गांधीला सांगू इच्छितो येथे नामर्द जन्माला येऊ शकत नाहीत. राहुल गांधी यांनी सावरकरांवर हिणकस पद्धतीने टीका केली आहे. ज्यांनी देशासाठी हौतात्म पत्करले आहे. ते आम्ही विसरू शकत नाही. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यांसाठी जे काय केले त्यांचा आम्हाला आदर आहे. परंतु सावरकरांवर टीका करणे योग्य नाही. सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. सावरकर आणि त्यांचे बंधू एकाच जेलमध्ये होते. परंतु त्यांना माहित नव्हते. मात्र राहुल गांधी या नालायक कारट्याने सावरकरांचा अवमान केला असल्याची टीका यावेळी ठाकरे यांनी केली.
दरम्यान कोकणात प्रदूषणककारी प्रकल्प येणार नाहीत, त्याला शिवसेनेचा यापुढेही कायम विरोध राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.