पापं करणारी जी माणसं आहेत त्यांना राजकारणातून कायमचं नष्ट करून टाकलं पाहिजे : उद्धव ठाकरे
आमदार राजन साळवी यांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक
रत्नागिरी : जे धर्माच्या नावाने पापं करताहेत, त्यांचा पूर्ण नायनाट कर, असं साकडं शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धुतपापेश्वर चरणी घातलं. उद्धव ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातील श्रीदेव धुतपापेश्वर मंदिरात जाऊन सोमवारी दर्शन घेतलं. तसेच मंदिर बांधकामाची पाहणी केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण कसा वागतोय याचा लेखाजोगा देव ठेवत असतो. तुम्ही सर्वांनी साकडं घातलं आहे, मी पुन्हा मुख्यमंत्री होवो, पण माझी तशी इच्छा आधीही नव्हती आणि आताही नव्हती. पण जे धर्माच्या नावाने पापं करताहेत, त्यांचा पूर्ण नायनाट कर असं धुतपापेश्वर चरणी साकडं घातलं आहे.
पापं करणारी जी माणसं आहेत त्यांना राजकारणातून कायमचं नष्ट करून टाकलं पाहिजे, देव आपलं ऐकल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान मी परत नक्की येणार, मी पुन्हा येईन असं म्हटलं जायचं तसं नाही. भवानीशंकरा हे देशावरचं आणि महाराष्ट्रावरचं वरिष्ठ दूर मी तुझ्या दर्शनाला परत येईन असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आमदार राजन साळवी यांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक
आमदार राजन साळवी मिंधे गटामध्ये गेले नाही म्हणून त्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली. मग, मग सत्ताधारी भाजपचे आमदार गणपत गायकवाड मिंधेंकडे करोडो रूपये असल्याचे सांगतात. त्या मिंधेच्या घरी ईडीची धाड का नाही ? इच्छुक म्हणून राजापूर मतदारसंघामध्ये जे सध्या खर्च करीत आहेत त्यांच्यावर ईडीची धाड का नाही ? असा शब्दामध्ये रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.‘’ भ्रष्टाचारोंका साथ, गुंडोंका साथ, अपने दोस्तोंका विकास’ अशी नवी घोषणा राहील्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कोकण दौर्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांची शहरातील जवाहरचौकामध्ये पार पडलेल्या संवाद सभेमध्ये त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्या रश्मी ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, कुडाळचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह मोठ्यासंख्येने शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जवाहरचौकामध्ये दुपारच्या भर उन्हामध्ये झालेल्या या सभेला मोठ्यासंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. ठाकरे म्हणाले की, ईडीच्या चौकशीमध्ये राजन यांच्या मालमत्तेच्या मुल्यांकनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेली खुर्ची यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे दैवत असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले वडील आहेत. अशापद्धतीने दैवत, आई-वडीलांची कोणी किंमत करतं का ? कोणीही आयुष्याचा आणि सत्तेचा अमरपट्टा घेवून आलेला नाही. बदलत्या काळाप्रमाणे सत्ताबदल झाल्यानंतर किंमत करणार्यांचे काय होईल ? देशभरामध्ये सत्ताधार्यांच्या कारभाराचे चटके बसत आहेत. मात्र, स्वतः वेड पांघरून सार्यांना वेडं करायचं आणि पुन्हा सत्तेत यायचं असं चालू आहे. मी लढायला उभा आहे तो माझ्यासाठी नसून आपल्यासाठी आहे. आपल्यासोबत सर्वजाती-धर्माचे लोक आहे. त्यामुळे जातपात धर्म बाजूला ठेवून देशप्रेमी म्हणून एकत्र येवून देशावरचं कायमच संकट असं दूर करूया की जेणेकरून पुन्हा कोणी हुकूमशाहीचं नाव घेणार नाही.” आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची गेल्या काही महिन्यांपासून ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. त्यावर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “मी राजनची पाठ थोपटायला आलो आहे’ अशा शब्दामध्ये त्यांना पाठींबा दिला.
संकटाच्या काळात कोण साथ देतो यावरून आपले कोण आणि परके कोण हे कळते. संकटाच्या काळात राजन साळवी यांनी जी साथ दिली त्यामुळे आपणाला राजन साळवी यांचा अभिमान आहे अशा शब्दामध्ये कौतुक करताना एकवेळ गद्दार मोडेल मात्र, राजन वाकणार नाही. एवढेच नाही तर, समोरच्याला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दामध्ये त्यांना पाठबळ दिले. मी मेलो तरी, भगवा सोडणार नाही असे म्हणणे खासदार, आमदार लाभले हे राजापूरकरांचे भाग्य आहे. येत्या निवडणूकीमध्ये विजयाची हॅट्रीक साधूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विकासाला नव्हे तर विनाशकारी प्रकल्पांना आमचा विरोध – खासदार विनायक राऊत
आमचा विकासाला नव्हे तर विनाशकारी प्रकल्पांना विरोध आहे. कोकण उद्धवस्त करणारा रिफायनरी प्रकल्प उभारण्याचे वक्तव्य खेड, देवगड आदी भागामध्ये जावून करण्याऐवजी रिफायनरी प्रकल्पाची उभारणी होत असलेल्या राजापूरातील भागामध्ये येवून करून दाखवावे अशी टिका भाजपचे नेते, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर खासदार राऊत यांनी केली. कोकणचा विकास हाच ध्यास घेवून कार्यरत असलेल्या राजन साळवींना त्रास देणार्यांना धडा शिकवून आणि पुन्हा कोकणामध्ये भगवा फडकवूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोकणवासियांचा शिवसेनेलाच पाठींबा मिळणार : आमदार राजन साळवी
शिवसेनेवर कोकणाने प्रेम करताना नेहमीच भरभरून दिले आहे. शिवसेनेवरील कोकणवासियांचे हे प्रेम अद्यापही कायम असून कोकणवासियांचा यावेळीही निश्चितच शिवसेनेला पाठींबा मिळणार आहे. त्या माध्यमातून सर्वांच्या साथीने आगामी लोकसभा निवडणूकीत विजयाची हॅट्रीक साधूया असे आवाहन आमदार राजन साळवी यांनी केले.