रत्नागिरी : विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना उपनेते तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुठल्या नेतृत्वाशी तुलना करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे हे प्रत्येकाच्या ह्रदयात असल्याचं उदय सामंत यांनी म्हणत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सांगली, कोल्हापूरला जेव्हा पूर आला तेव्हा विरोधक कोणत्या यात्रेत होते हे राज्यानं पाहिलं आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही असं म्हणत विरोधकांना फटकारलं आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपच्या आंदोलनाबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, भाजपचं कालचं आंदोलन हे दुर्दैवी होतं. मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांना बदनाम करण्यासाठी हे आंदोलन होतं, त्या आंदोलनाची महाराष्ट्रात स्थिती काय झाली ते आपल्याला सोशल मीडियावरून कळलं आहे, त्या आंदोलनाबाबत काय चर्चा सुरू आहे हेही सर्वांना माहित आहे, अशी टीका सामंत यांनी यावेळी भाजपवर केली.