
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात विधानसभा निवडणूक, जीएसटी आदी मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीवरून गुजरातचं राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः गुजरातमध्ये सभांचा धडाका लावलेला आहे. गुजरात काबीज करण्यासाठी पंतप्रधानांनी ५० सभा घेतल्या, मात्र एवढ्या सभा घेवूनही भाजप गुजरात निवडणुका हरला तर नरेंद्र मोदींना देशात थारा नाही अशी टीका उद्धव यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केली.
जीएसटीवरूनही त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच जीएसटी कमी करण्यात आला. पण या निवडणुका नसत्या तर हा जीएसटी कमी झाला असता का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. हार्दिक पटेलबाबत बोलताना उद्धव म्हणाले कि हे असले व्हीडीओ निवडणुकीच्या तोंडावरच का बाहेर येतात, गुजरातमधील राजकारण खालच्या पातळीवरच चालले आहे. ज्या लोकांच्या मुलभूत भावना आहे त्यामुळेच कुठेतरी याला वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच असे व्हीडीओ बाहेर काढले जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
अहमदनगरमधील शेतकरी आंदोलनाबाबत ते म्हणाले की या सगळ्यावरती बोललो तरी तुम्ही मला दुतोंडी म्हणाल, जनतेसाठी रस्त्यावर उतरलो आणि न्याय मिळवून दिला तर ते तुम्हाला आवडत नाही का? या प्रश्नाचा विचार आता सगळ्यांनी करायला हवा. सत्तेत राहून विघ्नसंतोषीपणा करणं माझी वृत्ती नाही, पण ज्या अपेक्षेने सरकारला पाठिंबा दिलेला आहे त्या अपेक्षेने सरकार उतरत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. हर्षवर्धन जाधव प्रकरणाबाबत त्यांच्याशी बोलेन, पण या प्रकरणावरून भाजपचे मुखवटे आता गळून पडत आहे, असेही उद्धव म्हणाले.
लाभार्थी जाहिरातीवरूनही राज्यसरकारवर टीका
जाहिरातीवर कोट्यवधी खर्च करायचे, पण जिल्हा परिषदेला निधी नाही. मग विकासकामं कशातून करायची. माझ्या गोरगरीब जनतेच्या मुळावर हे सरकार येणार असेल, तर मी त्या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी शिवसेना सत्तेत राहून दोन दगडांवर पाय ठेवत आहे असा आरोप केला होता, याला उत्तर देताना उद्धव म्हणाले की, त्यातला एक दगड राष्ट्रवादीचा आहे का? असाही प्रश्न त्यांनी केला.
ग्रीन रिफायनरीला विरोधच
राजापूर तालुक्यात जैतापूर पाठोपाठ आता प्रस्तावित असलेल्या पेट्रोकेमिकल ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबतही उद्धव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेला जर हा प्रकल्प नको असेल तर आम्ही सुद्धा जनतेच्या बाजूनेच राहू. आम्ही सत्तेत असलो तरी जीवघेणा रिफायनरी प्रकल्प आम्हाला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन कि बात करतात, मग जनतेची मन कि बात का ऐकत नाहीत. त्यामुळे जनतेला हवं तेच आम्ही करणार, सत्तेत असलो तरी टिका करणार असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.















