
मुंबई, 22 सप्टेंबर 2025 : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर तालुक्यातील उबाठा गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समितीच्या माजी सदस्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात विकास वेगाने सुरू असून, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक घटकाच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जात असून जीएसटी सुधारणांमुळे सर्व वर्गांना लाभ मिळणार आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू आता स्वस्त दरात मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीचा जागर करत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने होणारा प्रवास अधिक गतिमान केला आहे. आज ज्या विश्वासानी सर्वांनी प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही श्री.चव्हाण यांनी दिली.
यावेळी आ. चैनसुख संचेती म्हणाले की, भाजपाच्या ध्येयधोरणांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होणार असल्याचा विश्वास असल्यामुळे आज उबाठा सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातून अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यांच्या प्रवेशामुळे नांदुरा, मलकापूरमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये नांदुरा तालुक्यातील सरपंच सुरेश फेरण, सहदेव दळवी, पुंजाजी घुले, पवन कुटे, गोपाळ सातव, मयूर बोंबटकर, संतोष ठाकरे, नारायण झाल्टे, राजू पाटील, दिलीप नेमाडे, शेखर जाधव, जितेंद्र सिंग सरदार सिंग जाधव, नारायण जाधव, संग्रामसिंग जाधव आदींचा समावेश आहे.मलकापूर तालुक्यातील प्रवीण पाटील आणि शिरीष डोरले यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.















