कोकणवृत्तसेवा विशेष
मुंबई, (अमित राणे) : पैसे दामदुप्पट करणारी योजना आणणार्या ट्विंकल एनवायरो. टेक या कंपनीच्या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. आपले कष्टाचे पैसे मिळतील की नाही? अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. दर गुरुवार आणि शुक्रवार आपले पैसे कंपनी देईल, या आशेने ठेवीदार वडाळ्यातील ट्विंकलच्या कार्यालयात हजेरी लावत आहेत. त्यांच्या हाती फक्त निराशाच पडत आहे. आज संतप्त झालेल्या ठेवीदारांनी कंपनीचे प्रवर्तक ओम गोयंका यांच्या कारलाच घेराव घातला आणि शिव्यांची लाखोली वाहिली. अखेर तेथे असणार्या दोन पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर गोयंका यांना जाऊ देण्यात आले.
वडाळा येथे शिपलीन इमारतीत बेसमेंट ला कंपनीचे कार्यालय आहे. जाळीचे कुंपण आणि त्याला कुलुप, तेथूनच कागदपत्रांची देवाणघेवाण सुरू आहे. कागदपत्रांवर केवळ शिक्के मारले जात आहेत आणि पुन्हा या असे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान मला चक्कर येत आहे, असे गोयंका यांनी सांगितले आणि ते त्यांच्या कारमध्ये बसले, यानंतर ठेविदारांनी त्यांना घेराव घातला. आमचे पैसे द्या, असा तकादाच त्यांच्या मागे लावला. उपस्थित पोलिसांनी अखेर हस्तक्षेप केला.
आपले पैसे मिळतील की नाही? अशी भिती ठेवीदारांना सतावू लागली आहे. आमची कंपनीने फसवणूक केली आहे, सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी उपस्थित ठेवीदारांनी यावेळी केली आहे. माझे १ लाख रुपये आहेत, असे पंचेचाळीस वर्षांच्या परमींदर वालिया यांनी सांगितले. तर एल्फिन्स्टन रोड येथून अंध असणारे कदम हे ही पैसे मिळतील या आशेने येथे आले होते.