रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर- सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेस उद्या सोमवारपासून ‘तुतारी एक्सप्रेस’ या नावाने धावणार आहे. मराठीतील आद्यकवी केशवसुत यांना आदरांजली म्हणून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दादर – सावंतवाडी – दादर गाडीचे ‘राज्यराणी एक्स्प्रेस’ हे नाव बदलून ते ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्याचा निर्णय घेतला आहे. नामकरण समारंभ दादर पूर्वेतील कोहिनूर सभागृह, येथे सोमवारी (ता. २२) सायंकाळी ४.३० वाजता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते होणार आहे.
केशवसुत हे रत्नागिरीतील मालगुंड गावचे सुपुत्र होते. त्यांच्या ‘तुतारी’ कवितेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत त्यांचा सन्मान करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वे नं. ११००३/११००४ दादर – सावंतवाडी – दादर राज्यराणी एक्स्प्रेसचे नाव बदलून आता ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्यात येणार आहे.