मुंबई : तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येत्या पाच ते सहा दिवसांत अतिरिक्त यंत्रणा राबवून तसेच दोन पाळ्यांमध्ये (Shift) काम करून उर्वरित तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान दिले.
तुरीला योग्य भाव मिळण्यासाठी शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तूर व तूर डाळींचे भाव किफायतशीर व स्थिर राहावेत यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यातील तुरीच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदी केंद्रांवर उर्वरित नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी प्रक्रिया सुरू असून ती येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.
उर्वरित तुरीची गतिमान पद्धतीने खरेदी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात सर्वाधिक तूर खरेदी बाकी असल्याचे लक्षात घेऊन खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. धारणीमध्ये अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात आले असून आता एकूण ११ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावर दहा वजनकाटे ठेवण्यात आले आहेत. पुरेशा प्रमाणात ग्रेडर उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागातील पर्यवेक्षक तसेच सहाय्यक निबंधक यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून तुरीचे जलद ग्रेडेशन करून खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बारदाण्याची पुरेसी व्यवस्था करण्याचे तसेच साठवणुकीसाठी खाजगी गोदामांचे अधिग्रहण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
चांगले पर्जन्यमान आणि राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांमुळे राज्यात सन २०१६-१७ मध्ये १५.३३ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी होऊन भरघोस उत्पादन झाले. सन २०१५-१६ या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच पट अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील तुरीचे भाव घसरल्यामुळे शासनाने तातडीने राज्यातील ३२३ खरेदी केंद्रांवर तूर खरेदीची सुविधा निर्माण केली. किंमत स्थिरता निधी अंतर्गत किमान आधारभूत दराने १५ डिसेंबर २०१६ पासून नाफेड, एफसीआय व एसएफएसीच्यावतीने पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ, आदिवासी विकास मंडळ आणि महाएफपीसी या संस्थांमार्फत तूर उत्पादक जिल्ह्यांमध्ये तुरीची खरेदी सुरु करण्यात आली होती. जास्तीत जास्त तुरीची खरेदी होण्यासाठी राज्याने केंद्र सरकारला वेळोवेळी विनंती केल्याने २२ एप्रिलपर्यंत तीन वेळा मुदतवाढ (दि. ३१ मार्च, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल) मिळाली होती. या केंद्रांवर ५०५० (४२५ रुपये केंद्राच्या बोनससह) या किमान आधारभूत किंमतीने २२ एप्रिलपर्यंत २ लाख ५८ हजार 341 शेतकऱ्यांची १८३९ कोटी रुपयांची ४० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. आंतराष्ट्रीय बाजारात तुरीचे दर ४१५० रुपये असताना राज्य शासन त्याहून अधिक दराने तुरीची खरेदी करत आहे. या केंद्रावर खरेदीच्या शेवटच्या दिवशी आलेल्या तुरीची खरेदी राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे.