मुकेश माचकर यांच्या फेसबुक वॉलवरून : सिनेमाच्या पोस्टरवर वडील आणि मुलगा यांचा फोटो, समोर स्नूकरचं टेबल आणि सिनेमाचं नाव याच्यातून ही कहाणी स्नूकरच्या खेळाभोवती फिरणारी असणार, वडील तुलसीदास सिनियर आहेत, म्हणजे त्यांचा वारसा ज्युनियर पुढे चालवत असणार, चँपियन बनत असणार, हे आपोआपच स्पष्ट होतं… अशा पोस्टरवरूनच प्रेडिक्ट करता येणाऱ्या गोष्टी रंजक करणं हे फार अवघड काम असतं. ते लेखक दिग्दर्शक मृदुल महेंद्र यांनी फारच मस्त जमवून आणलेलं आहे… सिनेमाचा निर्माता आणि सिनेमाच्या क्राफ्टवर भक्कम पकड असणारा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर याचा पटकथेत सहभाग आहे, त्याचाही भट्टी जमवण्यात मोठा वाटा असणार. लेखक-दिग्दर्शकाबद्दल शेवटी एक मोठा उलगडा आहे. हा सिनेमा इतका ऊबदार अनुभव कसा देतो, याचे एक रहस्य तिथे उलगडून जाते.
१९९४च्या आसपास कोलकात्यात घडणारी ही कथा. १९९०च्या सिनेमांचा एक वेगळा फ्लेवर होता, त्याचप्रमाणे त्या काळात लहानाचे मोठे झालेल्यांनी एक वेगळा भारत पाहिलेला आहे. तो जिवंत करण्यासाठी कोलकात्याइतकी चांगली जागा नाही. ते महानगर बऱ्याच भागांत १९९०च्याही आधीच्या काळात गोठलेलं आहे. दारूच्या आहारी गेलेल्या वडिलांवरचा लूझर हा शिक्का पुसून काढणारा मुलगा स्नूकरच्या वेडाने झपाटून जातो. योग्य वेळी त्याला सलाम भाई या एकेकाळच्या नॅशनल चँपियनचं मार्गदर्शन मिळतं आणि तो एका सलग विजयांनी मस्तवाल झालेल्या धेंडाचा नक्षा उतरवतो, अशी साधीसोपी कथा. ती जास्त गुंते न करता, फाटे न फोडता सहजगतीने मांडलेली आहे सिनेमात.
मिडी (हे त्या मुलाचं नाव) स्नूकर शिकण्यासाठी उच्चभ्रूंचा क्लब सोडून वेलिंग्टन या गरीब वस्तीतल्या, प्रत्येक गेमवर अंडापावची बेट लावणाऱ्या रस्त्यावरच्या टपोरींनी भरलेल्या क्लबची निवड करतो, हा या सिनेमाचा एक प्रकारचा टर्निंग पॉइंट आहे. ही जागा नसती, तरी सिनेमा कदाचित उत्तम झाला असता, पण त्यातलं काहीतरी मौलिक हरवलं असतं. तो ट्रामचा, गदारोळाचा, जुनाट इमारतींचा, पण चैतन्याने रसरसलेला कोलकाता तुलसीदासच्या कथेला एक वेगळा आयाम देतो.
स्पोर्ट्स फिल्म्समध्ये ज्या खेळावर फिल्म आहे, तो खेळ न समजणाऱ्या माणसांपर्यंत ती पोहोचवायची कशी, हा मोठा प्रश्न असतो. तो खेळ समजावूनही सांगायचा आणि ते डॉक्युमेंटरीसारखं बोअर करायचं नाही, हे मोठं आव्हान असतं. ते इथे संजय दत्तच्या माध्यमातून फार बहारीने केलेलं आहे… त्याला सिनेमाचे संदर्भ जोडल्याने तर स्नूकरचं टेबल पाहिलं की यापुढे अमिताभचा चुम्मा, रजनीकांतची फाइट, मिथुनचा झटका हेच आठवत राहील…
कोणतीही स्पोर्ट्स फिल्म (डॉक्युड्रामा नसेल तर) खेळाच्या माध्यमातून माणसांची गोष्ट सांगत असते… खेळ हे एक प्रतीक, एक माध्यम असतं… ते जेवढ्यास तेवढं असलं पाहिजे, कळलंही पाहिजे, ऑथेंटिकही वाटलं पाहिजे (जुन्या संगीतमय सिनेमांत गिटार खाजवणारे, ड्रम्सवर तुटून पडणारे, पियानोवर दोन ठिकाणी बोटं आपटत बसणारे नायक असायचे, तसला हास्यास्पद प्रकार आता चालत नाही) आणि त्याच्या तांत्रिक गुंत्यांमध्ये सिनेमा अडकलाही नाही पाहिजे, ही तारेवरची कसरत असते. ती लेखक-दिग्दर्शकांनी फार मस्त साधली आहे.
तुलसीदास ज्युनियर बनलेल्या वरूण बुद्धदेवच्या खांद्यावर सगळा डोलारा आहे सिनेमाचा. फार क्यूट मुलगा आहे हा. निरागसपणा आणि मोठे होत असताना येत जाणारी समज यांचं मस्त दर्शन तो घडवतो. प्रत्येक गोष्टीत पैसा कमावू पाहणारा, त्याचा मोठा भाऊ गोटी चिन्मय चंद्रनशूह याने फारच भन्नाट साकारलाय. मोठी भावंडं एका वयात क्रूरही असतात, लहान भावंडांचं रॅगिंगही करतात- त्याला उगाच खोटा मुलामा देणं लेखक-दिग्दर्शकांनी टाळलेलं आहे. त्यामुळे त्याचा कमालीचा रागही येतो, पण नंतर त्याच्याबद्दल प्रेमही वाटायला लागतं. दलीप ताहिल नेहमीच्या झोकात आहे. पण सिनेमाचा खरा अँकर आहे संजूबाबा. खतरनाक काम केलंय त्याने. सलाम भाई हा गरीब वस्तीत वाढून नॅशनल चँपियन झालेला स्नूकरपटू त्याच्या पर्सनॅलिटीतून लार्जर दॅन लाइफ बनून जातो. त्याच्या तोंडून स्नूकरच्या माध्यमातून आयुष्याचं जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, तेही फार आतून आलेलं वाटतं. अभिनयाशी संजय दत्तचा संबंध काय, असं अनेकांना अजूनही वाटतं. पण, तो त्याच्या झोनमध्ये किती छान सहजतेने स्थिरावलेला आहे, हे या सिनेमातून दिसून येतं. अशा सिनेमांमध्ये एक अशी व्यक्तिरेखा असावी लागते, जिला पाहिलं की आता सगळं नीट होईल, असा दिलासा मिळतो. तो दिलासा देण्याची ताकद फार कमी अभिनेत्यांमध्ये असते. त्यात संजूबाबाच्या या भूमिकेचा समावेश नक्की करावा लागेल.
या सिनेमातला सगळ्यात चटका लावणारा घटक आहे दिवंगत राजीव कपूर. राज कपूरच्या मुलांपैकी सगळ्यात अपयशी मुलगा. तो त्याचं आयुष्य तब्येतीत जगला. पण त्याला ३० वर्षं कोणी रोलच दिला नव्हता, तो का, हा प्रश्न पडतो हा सिनेमा पाहिल्यावर. रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचं (या वयातलं) मिश्रण असणारा चेहरा, खास कपूरी देहयष्टी आणि ऋषी कपूरच्या नजीक जाणारा अभिनय, केवढी गुणवत्ता होती ही. दारूच्या आहारी गेलेला पण ब्रिलियंट स्नूकरपटू असलेला तुलसीदास सिनीयर त्याने फार सहजतेने साकारलेला आहे. ऋषी कपूरच्या सेकंड इनिंग्जच्या जवळपास जाणारी कामगिरी तो करू शकला असता, अशी चुटपुट लागून राहते. पण, कपूर असूनही बऱ्यापैकी अज्ञातच राहिलेला राजीव या सिनेमामुळे लोकांना पुन्हा आठवेल आणि आता त्याचा विसर पडू शकणार नाही, ही फार मोठी गोष्ट.
तर, सांगायचा मुद्दा इतकाच की नेटफ्लिक्सवर तुलसीदास ज्युनियर सहकुटुंब पाहा, मुलांना आवर्जून दाखवा. त्यांच्याबरोबर पाहा. एक संध्याकाळ सार्थकी लागेल.















