रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): मंडणगड तालुक्यातील तुळशी-पाले सीमेवर लागलेल्या वणव्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या वणव्यात आंबा, काजूच्या बागा जळून खाक झाल्या.
तालुक्यात डिसेंबर ते मार्च दरम्यान वणवे लागण्याच्या घटना वाढताना दिसतात. वनव्यांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील दोन हजार एकर वरील वनसंपदा जळून नष्ट झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा वणवा पेटल्यामुळे उर्वरित वनसंपदा आगीत जळून खाक झाली. यात नुकतीच लागवड करण्यात आलेली, तीन वर्षांची वाढ झालेली काजू कलमे, मोहरून फळधारणा झालेली आंब्याची झाडे होरपळून गेली आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या आशेत असलेल्या शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.