ठाणे : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तब्बल १२ हजार लोकांच्या सहभागातून रविवार, २९ जुलै रोजी अंबरनाथ जवळील खुंटवली या गावात अवघ्या काही तासांत ५८ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. खासदार डॉ. शिंदे आयोजित वृक्षारोपण महाअभियानाचे हे दुसरे वर्ष होते. गतवर्षी श्रीमलंग गड परिसरातील मांगरुळ येथे ५ जुलै रोजी तब्बल २० हजारांहून अधिक लोकांच्या सहभागातून एकाच दिवसात एक लाख झाडे लावण्याचे यशस्वी महाअभियान खासदार डॉ. शिंदे यांनी राबवले होते.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभियानाचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,अंबरनाथ नगरपरिषद, नार्डेको आणि वनविभाग सहआयोजक होते.
अंबरनाथ आणि परिसरातील ५० हून अधिक विविध संस्था, समाजमंडळे, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि महिला बचत गटांच्या सदस्य, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार असे सुमारे १२ हजार लोक या विधायक कार्यासाठी एकत्र आले होते. जनशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करण्याच्या उद्दिष्टानेच गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू केल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.
राज्य सरकारने तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावण्याचा उद्दिष्ट निश्चित केले असून त्या अंतर्गत गेल्या वर्षी ४ कोटी झाडे लावण्यात आली, तर यंदा १३ कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र,पर्यावरणाची जपणूक व संवर्धन हे केवळ सरकारचे काम नसून त्यात लोकांचा सहभाग वाढला तर खऱ्या अर्थाने ही लोकचळवळ बनून पर्यावरण संवर्धनाचे काम जोमाने होईल, असेही खा. डॉ. शिंदे म्हणाले.
गतवर्षी खा. डॉ. शिंदे यांनी मांगरूळ येथे वनविभागाच्या ८० एकर जागेवर लोकसहभागातून एकाच दिवसात एक लाख झाडे लावण्याचा उपक्रम राबवला होता. त्यात २० हजारहून अधिक लोक सहभागी झाले होते. केवळ एका दिवसापुरती झाडे लावून न थांबता तिथे पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था आणि देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करून त्या झाडांचे जोमाने संगोपन करण्यात येत आहे.
याच धर्तीवर यंदाच्या वर्षी आयोजित अभियानात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वनविभागाचे उपमुख्य वनसंरक्षक जीतेंद्र रामगावकर, अंबरनाथच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, आमदार डॉ. बालाजी किणिकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उल्हासनगरचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.