मुंबई : राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला असून राज्यात उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड होईल असा विश्वास सर्व जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला तर या महिनाभरात होणाऱ्या महावृक्षलागवडीसाठी सर्वांना शुभेच्छा देतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीत अधिकाधिक लोकसहभाग मिळवा, वृक्ष लागवडीचे अभियान यशस्वी करा, असे सांगताना वृक्ष लागवड कार्यक्रमात पारदर्शकता जपण्याचे आवाहन केले.आज अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वनाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला आणि राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीचा अंतिम आढावा घेतला यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह वन आणि नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सर्व अधिकाऱ्यांनी वृक्षलागवड कार्यक्रमाची सुनियोजित दैनंदिनी तयार करावी, १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करण्यात येत असलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमाचे स्थळ, वेळ आणि लोकसहभागाची सुनिश्चितता करावी अशा सूचना देऊन वनमंत्री म्हणाले, वृक्ष लागवड मोहिमेत शंकेला स्थान राहू नये म्हणून केलेले सर्व काम वन विभागाच्या संकेतस्थळावर फोटो, व्हिडिओ आणि लावलेल्या रोपापासून अपलोड केले जावे. दर सहा महिन्यांनी या वृक्षारोपण स्थळांची, वाढलेल्या रोपांची, प्रजातींची माहिती या संकेतस्थळावर नव्याने भरण्यात यावी. अशा पद्धतीने पुढील दोन वर्षात चार वेळा ही माहिती अद्ययावत केली जावी. जेणेकरून वृक्ष लागवडीची माहिती घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला याबद्दलची सविस्तर माहिती अक्षांश रेखांशासह मिळू शकेल.महात्मा गांधीजींनी १९३६ मध्ये सेवाग्राम येथे लावलेल्या पिंपळाच्या झाडाच्या सालीपासून कलमं तयार करून ही रोपं ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात पुढच्या वर्षी राज्यातील २०६ शहीद स्मारकांमध्ये लावण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली. त्यांनी काही जिल्ह्यातील वृक्ष लागवडीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुकही केले. औरंगाबाद विभागात ४३३ टेकड्यांवर वृक्ष लागवड होत असून प्रत्येक टेकडीसाठी आयुक्तांनी एक टेकडी अधिकारी नेमला असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपळवन, बांबू वन, ऑक्सीजन पार्क, बेल वन, सीताफळ वन, आंबा वन, चिंच वन,नक्षत्र वन, वड-पिंपळ आणि कडुनिंबाचे त्रिमूर्ती वन अशी वने राज्यभरात विकसित केली जात आहेत. काही ठिकाणी फळझाड रोड, फुलबाग रोड, शोभिवंत वृक्ष रोड अशा नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या जात आहेत, नदीकाठी वृक्षलागवड होत आहे. जलसंपदा प्रकल्पाच्या काठाने वृक्ष लागवडीचे नियोजन झाले आहे. कार्यालय तिथे श्रीफळ संकल्पना राबविली जात आहे, शालेय विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थ्यांना ट्री प्रोग्रेस कार्ड देण्यात येत आहे. गोंदियात दुर्मिळ वृक्षप्रजातींची लागवड होत आहे. यवतमाळ मध्ये २५ एकरांवर ऑक्सीजन पार्क विकसित होत आहे. कुठे शुभेच्छा तर कुठे शुभमंगल वृक्ष लागत आहेत, कुठे गृहप्रवेश वृक्ष लागणार आहेत. कुठे तुतीची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. या सर्व कल्पना स्वागतार्ह असून निश्चित कौतुकास्पद आहेत असेही ते म्हणाले.