मुंबई : लोकांनी ठरवलं तर ते पर्यावरण रक्षणाच्या कामात किती उत्तम योगदान देऊ शकतात हे मागील दोन वर्षात लोकसहभागातून झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातून दिसून आलं. हजारो हातांनी अगदी उत्स्फुर्तपणे गाव-शिवारात, वाडी-वस्तीत झाडं लावली. वन विभागाच्या वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त शासनाचा न राहता तो लोकांचा झाला. राज्यभरात २०१६ आणि २०१७ साली वृक्षलागवडीचा लोकोत्सव साजरा झाला. आता १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ही संधी पुन्हा सर्वांना उपलब्ध होणार आहे. राज्यात लागणार आहेत तब्बल १३ कोटी झाडं… आणि या महावृक्षलागवडीसाठी राज्यभरातील २१४२ रोपवाटिकांमधून उपलब्ध आहेत १९ कोटी ६२ लाख ९१ हजार ८२५ रोपं.. विविध प्रजातींची रोपं. ज्याला जे झाड आवडते त्याने त्या प्रजातीचे रोप लावायचे… पण रोप लावायचे आणि वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाचा दूत व्हायचं हे मात्र नक्की.राज्यातील १३ कोटी महावृक्षलागवड कार्यक्रमासाठी उंच वाढलेली, उत्तम दर्जाची रोपं उपलब्ध व्हावीत म्हणून वन विभागाने अतिशय नियोजनपूर्वक पावले टाकली. राज्यात सामाजिक वनीकरण शाखा, वन विभाग, वन विकास महामंडळ, वन्यजीव मंडळ यासारख्या विविध यंत्रणांनी त्यांच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका विकसित केल्या. यामध्ये सामाजिक वनीकरण शाखेच्या ५५४ रोपवाटिका आहेत. तिथे ४ कोटी ७१ लाख ०४ हजार ०४५ रोपं लागवडीसाठी तयार आहेत. वन विभागाच्या अखत्यारित १५६९ रोपवाटिका आहेत. येथे १४ कोटी ५८ लाख १८ हजार ६३६ रोपं विकसित करण्यात आले आहेत. वनविकास महामंडळाच्या १३ रोपवाटिका आहेत. तिथे ३३ लाख ५२ हजार ७०६ रोपं उपलब्ध आहेत. रोपं लावू इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाला रोपं मिळेल इतकी रोपं राज्यात उपलब्ध आहेत. यात इमारतीसाठी लागणाऱ्या लाकूड प्रजातीची रोपं आहेत, बांबूच्या विविध प्रजाती आहेत, फळझाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, धार्मिकदृष्टया महत्त्वाची आणि मागणी असलेली रोपं देखील या रोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्मिळ वृक्ष प्रजातींचाही यात समावेश आहे.इमारतीसाठीच्या लाकडासाठी लागणाऱ्या रोपांमध्ये साग, ऐन, बीजा, हलदू, तिवस, शिसम, शिवण, खैर, दहीपळस, कडूनिंब या प्रजातींचा समावेश आहे. बांबू प्रजातींमध्ये मानवेल, कटांग, मानगा, बालकोआ, ग्रीन बांबू, चा समावेश आहे. फळझाड लागवडीसाठी आवळा, आंबा, कवठ, खिरणी, चार, चिंच, जांभूळ, टेंभरूण/तेंदू, फणस, बिबा, बोर, सीताफळ, आळीव, बेल या प्रजाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत.शोभेच्या वृक्षांमध्ये बहावा, सेमल/सावर, जारुळ, पळस, पांगरा, गोल्डन बांबू, कायजेलिया, काशिद, गुलमोहर, पेल्टोफोरम, बकुळ, भेंडी, सप्तपर्णी, सिसू, स्पथोडिया प्रजातीची रोंप मिळू शकतील. औषधी प्रजातींमध्ये आवळा, बेहडा, हिरडा, शिवण, टेटू, पारड, बेल, अग्नीमंथ, अर्जुन, गोंगल, तिखीफुली, निरगुडी, पळस, बिजा, भोवरसाल, मेडसिंग, रक्तचंदन, वर्णा, सावर, निर्मली, अंकोल या प्रजातींची रोपं मिळू शकतील. धार्मिक महत्त्वानुसार जी रोपं आपल्याला मागणीनुसार मिळणार आहेत त्यामध्ये जरुळ, पिंपळ, उंबर, वड, बेल, सीताअशोक, बकुळ, वर्णा, सौंदड/ शमी चा समावेश आहे.दुर्मिळ वृक्ष प्रजातींमध्ये टेटू, चंदन, अशोक, नरक्या, बिजा, बेल, रान शेवगा, नागकेशर, ओमट, राळधुप, कोकम, कडू कवठ, त्रिफळ मिळू शकेल. जंगलामधून झपाट्याने कमी होत असलेल्या गोंगल, खवसा, कुमकुम, गोंधन, मैदा लकडी/लेंजा, कड/कडाई, कुसुम, आंबाडा, निर्मली, अंकोल या वृक्ष प्रजातींचा समावेश आहे. चला तर मग वनमहोत्सवात हजारो हातांनी लावू झाडं.. चिंच, आंबा, पिंपळ, वड.