मुंबई : सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभाग, मुंबई यांच्यावतीने आयोजित रस्ते सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या तीन वर्षात राज्यातील रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, अपघात कमी करण्यासाठी सुधारणेस आणखी वाव आहे. परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी आणखी प्रयत्न व जाणीव जागृती तसेच नवनवीन उपक्रम राबवावेत. सीसीटीव्ही नेटवर्क, ई-चलान या उपक्रमामुळे बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे सोपे झाले. तसेच यामुळे लोकांमध्ये धाक बसून वाहतुकीच्या शिस्तीत वाढ झाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमामातून लोकांच्या सवयी, घडणारे गुन्हे, वाहतूक यांचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्य होत आहे. ही यंत्रणा आता लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे पुण्यातील वाहतूक सुधारण्यास अधिक मदत होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक असली तरी येथील नागरिक नियमांचे पालन योग्य रितीने करत असल्यामुळे कमी त्रास होतो. वाहनचालकांवरील कारवाईबरोबरच त्यांचे नियमासंबंधी प्रबोधन, जागृती होणे आवश्यक आहे. नागरिकांबरोबरच मुलांच्या वाहतूकविषयक शिक्षणासाठी राज्य शासन पावले उचलत आहे. परिवहन विभागाने राबविलेल्या ‘नो हाँकिंग’ हा उपक्रमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ही एक लोकचळवळ झाली आहे. बेशिस्त रस्ते तसेच अभियांत्रिकी क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येत आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर शून्य अपघातासाठी स्मार्ट इंटिलिजन्स असलेली यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गावरसुद्धा अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा पंधरवडा हा फक्त साजरा न करता यातून सुरक्षित प्रवासासाठी लोकप्रबोधन व जागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. परिवहनमंत्री रावते म्हणाले, रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग व वाहतूक विभाग काम करत आहे. वाहने रस्त्यावर येण्यापूर्वीच ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावेत, यासाठी तंत्रशुद्धरित्या वाहन तपासणी करणारी स्वयंचलित यंत्रणा परिवहन विभागाच्या वतीने उभारण्यात येत आहे. तसेच शिकाऊ वाहनचालकांसाठी संपूर्ण ऑनलाईन यंत्रणा राज्यातील परिवहन कार्यालयात उभारण्यात आली आहे. परिवहन विभाग सक्षमपणे काम करत असून नवनवीन पद्धतीचा वापर करत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रस्ता सुरक्षा निधी जमा झाला आहे. राज्यात सुमारे 3 कोटी 28 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये 36 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. मुंबईसारख्या शहरात त्यामुळे वाहनतळाची समस्या निर्माण झाली आहे. पुरेशा प्रमाणात वाहनतळे उभारल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली आहेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवित असून आणखी प्रयत्न केले जात आहेत, असेही श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार, परिवहन आयुक्त शेखर चन्ने आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस, परिवहनमंत्री श्री. रावते यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांनी प्रास्ताविकात वाहतूक विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.