
मुंबई: २७ मार्च: समाज माध्यमांच्या काळातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित आहे. शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत व ललित लेखनापासून संशोधनापर्यंत पुस्तकांकडे वळावेच लागते. इ-पुस्तके प्रचलित असली, तरी सुट्टीच्या दिवशी बाल्कनीत चहाचा घोट घेत छापील पुस्तक वाचण्याचा आनंद अवर्णनीय आहे! ज्ञानाचा सन्मान होत आलेल्या भारतात पुस्तके पवित्र आहेत. त्यांचे जतन व्हावे म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालयाने आज ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘ग्रंथांचे जतन व संवर्धन’ प्रशिक्षण आयोजित केले होते. कार्यशाळेचे उद्घादन श्री. श. का. काकड, जिल्हा ग्रंथालय संचालक, मुंबई, यांच्याहस्ते झाले.
ग्रंथांचे नुकसान का होते व कसे टाळावे?
ग्रंथ टिकविण्यासंबंधी तांत्रिक माहिती ग्रंथ संवर्धक व पुनर्बांधणीकार श्री. ओमकार कडू यांनी दिली. वाळवी, कसर, अन्य कीटक, बुरशी व उंदरांकडून पुस्तके खराब किंवा नष्ट होतात. अतिरिक्त सूर्यप्रकाश व तापमान, आर्द्रता, प्रदूषण व खराब हाताळणीमुळेही पुस्तके खराब होतात. यांपासून पुस्तकांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय सांगितले. सूर्यप्रकाश सतत पुस्तकांवर पडत असल्यास खिडक्यांना अंशतः पारदर्शक पडदे किंवा काचांना गडद आवरण लावले जाऊ शकते. कृत्रिम उजेडाची गरज असल्यास जुन्या प्रकारचे उष्णता निर्माण करणारे बल्ब टाळावे. ते पुढे म्हणाले, “सापेक्ष आर्द्रता ४५-६०% असल्यास पुस्तकांसाठी उत्तम. आर्द्रता मोजणारी व कमी करणारी उपकरणे लावता येतात. एक्झॉस्ट पंखे व हवा खेळती ठेवणारी उपकरणे उपयोगी पडतात. पुस्तकांसाठी अग्निरोधक मुलामा दिलेली स्टेनलेस स्टील कपाटे सर्वोत्तम. दुर्मिळ पुस्तके आर्काइव्स पेट्यांमध्ये ठेवून जतन करावी. दुर्मिळ चित्रांमध्ये आम्लशोषक कागद ठेवावे. कीटकनाशके वापरून व ग्रंथालयात अन्नसेवन टाळून कीटकांना दूर ठेवता येते.”
डिजीटायझेशन व संवाद कौशल्यांचे महत्त्व
दुपारच्या सत्रात दुर्मिळ ग्रंथ आणि हस्तलिखिते जतन करण्यासाठी डिजीटायझेशनच्या उपयुक्ततेची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. सुभाष आठवले, ग्रंथपाल, सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर, म्हणाले, “डिजीटायझेशन करायचे ठरवले की योग्य तयारी करावी लागते. कॉपीराईटसंबंधी मुद्द्यांपासून ते उपकरणांच्या निवडीपर्यंत पाहावे लागते. वाचकाला दुर्मिळ ग्रंथांतील ज्ञान सहजपणे शोधून वापरता आले पाहिजे. पुस्तकाची उपलब्धता व परिस्थितीचा अभ्यास करून डिजीटायझेशनचा निर्णय घ्यावा.” पुढील सत्रात, प्रसिद्ध निवेदिका व लेखिका, श्रीमती दीपाली केळकर यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांना आवश्यक संवाद कौशल्यांवर माहिती दिली. डॉ. विनय सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, म्हणाले, “पुस्तकांचा केवळ स्पर्श व गंध आपली अभिरुची जागृत करतात. यातून पुस्तकांप्रति प्रेम निर्माण होते व जतन सहज शक्य होते.”
कार्यशाळेत मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, जळगाव व सोलापूर जिल्ह्यांतील सार्वजनिक, खाजगी आणि शाळा व महाविद्यालय ग्रंथालयांतून ४० ग्रंथपाल व कर्मचारी उपस्थित होते. सहभागी श्री. मंगलेश्वर शर्मा, समन्वयक, ग्रंथालय, केईएम रुग्णालय, मुंबई, म्हणाले, “येणाऱ्या पिढीला ग्रंथरुपी वारसा देण्यासाठी त्यांचे संवर्धन महत्त्वाचे आहे, जे आम्ही इथे जाणून घेतोय.” के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळचे श्री. विनोद मंगाळे म्हणाले, “आमच्या जिल्ह्यातील ३६ वर्षांपासून विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्तलिखितांचे डिजीटायझेशन करण्यासाठी या कार्यशाळेचा फायदा होईल.” डॉ. प्राजक्ता म्हाप्रळकर, ग्रंथपाल, निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स, म्हणाल्या, “बहुतांश कार्यशाळा डिजिटल माध्यमांबद्दल असताना पुस्तकांविषयीची ही कार्यशाळा अनोखी आहे. ग्रंथ संवर्धनासंबंधी अमुल्य माहिती मिळाली.” श्री. श्याम जोशी, ग्रंथसखा वाचनालय, बदलापूर यांच्या भाषणाने समारोप झाला. वाचनसंस्कृती टिकावी म्हणून पुस्तकांचे जतन करण्यासाठी या कार्यशाळेने खारीचा वाटा नक्कीच उचलला!
















