
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरीतील प्रसिद्ध मांडवी जेट्टीवर जाण्यास पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पी. प्रदीप यांच्या सुचनेनुसार प्रशासनाने बंदी घातली आहे.
जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हलगर्जीपणामुळे धबधबे, धरणात यापूर्वीही पर्यटक बुडण्याच्या, वाहून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच अपघात होऊन काही पर्यटक मयत झाले आहेत. त्यामुळे धबधबे आणि धरणांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता रत्नागिरीतील मांडवी जेट्टीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. समुद्राने रौद्र रूप धारण केलेलं आहे. त्यातच ही जेट्टी अपूर्ण अवस्थेत आहे. सद्यस्थितीत अनेक पर्यटक सदर जेट्टीवर जात असून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार मांडवी, रत्नागिरी जेटीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी केले आहे.














