
कल्याण : बँक तुमची नसून आमची सर्व लोकांची आहे. बँकेद्वारे एव्हढा मोठा स्नेह मिळत आहे. बँकेने वेळोवेळी सहकार्य केले आहे. बँकेमुळेच अनेकांची स्वप्नपूर्ती होऊन उद्योजकही झाले आहेत. माणसाला जगण्यासाठी हवा-पाणी-अन्न जरी गरजेचे असले तरी अर्थ हा विषय महत्वाचा असतो. आणि हाच विषय मोठ्या प्रमाणात टीजेएसबी सहकारी बँकेमुळे मार्गी लागत आहे. टीजेएसबी सहकारी बँकेच्या माध्यमातून सुखवास्तूचा पैलू तयार होतो असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी डोंबिवलीत केले.
टीजेएसबी सहकारी बँकेच्या विष्णूनगर डोंबिवली (पश्चिम) शाखेतर्फे 10 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्नेह संवर्धन पंधरवडा’ उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांना निमंत्रित केले होते त्यावेळी किरतकर बोलत होते. यावेळी शाखा व्यवस्थापक शमिता भिसे, उपशाखा व्यवस्थापक अर्चना चिरमुले, अधिकारी गणेश इंदुलकर, विशाखा रेडगांवकर, अक्षय ठोंबरे, नम्रता मोरे, ममता सातर्डेकर, वैष्णवी कदम, रोहित जाधव, सुरज कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी किरतकर पुढे म्हणाले, महिलांचे सक्षमिकरण होण्यासाठी बँकेनेही आर्थिक विषयाचे कार्यक्रम राबवावे. महिलांची आर्थिक वृद्धी होऊन त्यांना त्यांच्या परिवारामध्ये सहभाग घेता येईल. मोठ्या प्रमाणावर कष्टकरी मध्यवर्गीय महिला आहेत. त्यांना व्यवसाय लघुउद्योग करायचे आहेत यांच्यासाठी विशेष उपक्रम घ्यावेत अशा सुचना या ‘स्नेह संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने करत आहे.
‘स्नेह संवर्धन पंधरवडा’ उपक्रमात युग फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा कल्पना किरतकर यांनी ‘महिला सत्र’ कार्यक्रमात ‘महिला धोरण आणि अर्थ विषय’ या विषयावर विविध विषयांची मांडणी करून महिला व बँक यांचे नाते कसे दृढ होईल याची माहिती दिली. तर शाखा व्यवस्थापक शमिता भिसे यांनी बॅंकेबाबत माहित देतांना सांगिलते कि, बँकेच्या एकूण 137 शाखांच्या माध्यमातून विस्तार झाला असून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश राज्यात बँक कार्यरत आहे. बँकेचे एकूण सभासद संख्या 54,334 असून नाममात्र सभासद 32,607 आहे. बँकेच्या एकूण व्यवहारात 7 टक्के वृद्धी झाली असून ढोबळ नफ्यात 20 टक्के व निव्वळ नफ्यात 23 टक्के वाढ झाली आहे. वर्षभरात बँकेचा एकूण महसूल 1031 कोटीवरून 1061 कोटी झाला आहे असे सांगितले.















