मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना काल रात्री घडली. त्यात एक वाडी वाहून जाऊन काही लोक बेपत्ता झाले आहेत, तसेच काही मृतदेह हाती लागले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून सुरु असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.