रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुटलं. यामध्ये तिवरे भेंदवाडीतील 12 ते 15 घरं पाण्यात वाहून गेली. या दुर्घटनेत 24 जण बेपत्ता आहेत. त्यातील काही मृतदेह सापडले आहेत. धरणाला गळती लागली होती, ग्रामस्थांनी वारंवार याबाबत पाटबंधारे खात्याकडे तक्रारीही केल्या होत्या. मात्र तात्पुरती मलमपट्टी करण्याखेरीज प्रशासनाकडून काहीच करण्यात आलं नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हे धरण फुटून होत्याचं नव्हतं झालं असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी, नायब तहसीलदार व प्रशासनाच्या इतर कर्मचाऱ्यांनी तीवरे गावाकडे धाव घेतली, आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
तीवरे गाव चिपळूण तालुक्याच्या एका टोकाला आहे. तीवरे गावात बांधण्यात आलेलं धरण 2000 साली पूर्णत्वास गेलं होतं. या धरणाच्या पाण्याची पूर्ण संचय पातळी 139 मीटर आहे. धरणाच्या पाणी साठ्याची एकूण क्षमता 2.45 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. धरणातील पाण्याचा दसपटीतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला उपयोग होत होता. प्रशासनाच्या 2 जुलैच्या रिपोर्टनुसार हे धरण 27.59 टक्के भरलं होतं. तर एकूण 131 मीटर पाणीपातळी होती..
दरम्यान या धरणाला दोन वर्षांपूर्वी गळती लागली होती. गेल्यावर्षी या गळतीत वाढ झाली होती. गळतीमुळे धरणाच्या मुख्य दरवाज्याशेजारी भगदाड पडलं होतं. याची वेळेत दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून गेल्यावर्षी या धरणाची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही धरणाच्या दुरुस्तीला काही वेग आला नव्हता. पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात धरणाला धोका पोचण्याचा शक्यताही वर्तविण्यात येत होती.. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती.. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
मंगळवारी रात्री या धरणाशेजारी असलेल्या भेंदवाडीतल्या घरांमधील माणसं काही जेवण करत होती, तर काही दिवसभर थकून भागून आल्यामुळे झोपण्याच्या तयारीत होते. मात्र अशातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. गळती लागलेलं धरण साडेनऊच्या सुमारास फुटलं आणि होत्याचं नव्हतं झालं. जवळपास 12 ते 15 कुटुंबातील 24 माणसं बेपत्ता झाली. काही दूर वर फेकली गेली, तर काही प्रवाहाबरोबर वाहून गेली.. पाणी ओसरून गेल्यावर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली पण होत्याचं नव्हतं झालं होतं.. कामानिमित्त शहरात असलेले घटनेची माहिती कळताच रात्रीच आपली माणसं, घरं पाहण्यासाठी वाडीत आले.. मात्र त्यांना दिसलं ते चिखल, वाहून गेलेली घरं, मोडलेले वासे.. त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती. कोणाचे आईवडील गेले होते, तर कोणाचे भाऊ, कोणाचा मुलगा, मुलगी तर कोणाचं अख्य कुटुंब वाहून गेलं होतं..
तिवरे गावातील धरण फुटल्यानंतर रात्री या गावाला जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी भेट दिली. आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान धरणाला गळती होती, आशा तक्रारी ग्रामस्थानीं यापूर्वी केल्या होत्या. माझ्यासमोर आज माझ्या समोर ही ग्रामस्थांनी वस्तुस्थिती सांगितली. दरम्यान या संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीचे होईल असं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे..
बेपत्ता नावं
अनंत हरिभाऊ चव्हाण (63)
अनिता अनंत चव्हाण (58)
रणजित अनंत चव्हाण (15)
ऋतुजा अनंत चव्हाण (25)
दुर्वा रणजित चव्हाण (1.5)
आत्माराम धोंडू चव्हाण (75)
लक्ष्मी आत्माराम चव्हाण (72)
नंदाराम महादेव चव्हाण (65)
पांडुरंग धोंडू चव्हाण (50)
रवींद्र तुकाराम चव्हाण (50)
रेश्मा रविंद्र चव्हाण (45)
दशरथ रविंद्र चव्हाण (20)
वैष्णवी रविंद्र चव्हाण (18)
अनुसिया सीताराम चव्हाण (70)
चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75)
बळीराम कृष्णा चव्हाण (55)
शारदा बळीराम चव्हाण (48)
संदेश विश्वास धाडवे (18)
सुशील विश्वास धाडवे (48)
रणजित काजवे (30)
राकेश घाणेकर(30)