रत्नागिरी : तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांवर काळाने घाला घातला आहे. हे एकत्र कुटुंब.. मात्र आपल्या भावाचं संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाल्याने अनंत चव्हाण यांचे भाऊ व इतर कुटुंबीय पुरते कोलमडून गेले आहेत.
तिवरे धरणाच्या शेजारी राहणारे अनंत चव्हाण अतिशय मनमिळाऊ.. अनंत चव्हाण त्यांचे दोन भाऊ कामानिमित्त शहरात असतात. मात्र अनंत चव्हाण आणि त्यांची पत्नी अनिता, मुलगा रणजित, सून ऋतुजा रणजित चव्हाण आणि दीड वर्षांची नात दुर्वा रणजित चव्हाण यांच्या सह तिवरे धरणाच्या शेजारी असणाऱ्या भेंद वाडीत रहात होते.. अतिशय आनंदात हे कुटुंब राहत होतं.. मात्र मंगळवारची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली..
अनंत चव्हाण हे सर्वात मोठे.. रामचंद्र चव्हाण आणि सुधाकर चव्हाण हे त्यांचे आणखी दोन भाऊ.. हे दोघेही कामानिमित्त बाहेर असतात.. पण यांचं कुटुंब एकत्र कुटुंब. पण या दोन भावांच्या मोठ्या भावाचं कुटुंब नियतीने उद्धवस्त केलं आहे.. आपला भाऊ या जगात नाही, भावाची पत्नी, मुलगा, सून, नात या दुर्घटनेत नियतीने हिरावून नेली.. त्यामुळे अनंत चव्हाण यांचे भाऊ पुरते कोलमडून गेले आहेत..
अनंत चव्हाण यांच्या कुटुंबात मधुकर साळुंखे यांची मुलगी दिलेली होती.. रणजितची पत्नी ऋतुजा चव्हाण मधुकर साळुंखे यांची मुलगी.. तीही या दुर्घटनेत गेली.. मात्र ज्या कुटुंबात आपली मुलगी दिली होती तिथे ती अतिशय सुखात संसार करत होती.. जावई, सासू सासरे सर्वच अगदी मनमिळाऊ होते, हे सांगताना मधुकर साळुंखे यांना अश्रू आवरत नाहीत.
एकाच कुटुंबातील पाच जणांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे…