
रत्नागिरी : तिवरे धरण दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांपैकी अजूनही 4 जण बेपत्ता आहेत. शनिवारी एकही मृतदेह सापडला नाही. शुक्रवारपर्यंत एकूण 19 जणांचे मृतदेह सापडले होते.
मंगळवारी झालेल्या तिवरे धरण दुर्घटनेनंतर एकच हाहाकार उडाला. अनेकांचे संसार धरणाच्या वाहून गेले आणि त्याबरोबर स्वप्नही वाहून गेली. या दुर्घटनेत 23 जण बेपत्ता झाले. गेले चार दिवस याबाबत शोधकार्य सुरू आहे. शुक्रवारपर्यंत 19 जणांचे मृतदेह सापडले होते. मात्र अजूनही 4 जण बेपत्ता आहेत. त्यांचं शोधकार्य सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
शिवसेना-भाजपमधील राजकीय साठमारीमुळे गेले बळी – भास्कर जाधव
आमदार भास्कर जाधव यांनी घटनास्थळी जाऊन तिवरेतील धरण दुर्घटनेत निष्पाप बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन आणि वाचलेल्या व्यक्तींना धीर दिला. यानंतर आमदार भास्करराव जाधव यांनी भाजप-सेनेचे सरकार, खेकड्यांमुळे धरण फुटले म्हणणारे त्यांचे मंत्री आणि प्रशासकीय यंत्रणेवर सडकून टीका केली. मंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या सरकारमधले मंत्री हेच खरे खेकडे आहेत. शिवसेना-भाजपमधील राजकीय साठमारीमुळे हे बळी गेल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. धरण दुर्घटनेस लघु पाटबंधारे विभाग, शासकीय यंत्रणा आणि सरकार हेच जबाबदार असल्याचा आरोपही आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.














