धरण दुर्घटनेत नळपाणी योजना झाली होती उद्ध्वस्त
रत्नागिरी, 3 August : तिवरे धरण दुर्घटनेत नळपाणी योजना उद्धवस्त झाली होती. मात्र वर्षभरातच नवी नळपाणी योजना पूर्ण झाली असून या तिवरे दुर्घटनाग्रस्तांच्या नव्या नळपाणी योजनेचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. वर्षभरातच तिवरे ग्रामस्थांना पाणी योजना देऊ शकलो , याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली.
तिवरे धरणफुटी दुर्घटनेत इथल्या परिसराचं होत्याचं नव्हतं झालं होतं, भेंदवाडी पूर्णतः उद्धवस्त झाली होती. या दुर्घटनेत 22 जण बेपत्ता झाले, पैकी 21 जणांचे मृतदेह सापडले तर चिमुकली दुर्वा अद्यापही बेपत्ता आहे. दरम्यान या येथील नळपाणी योजनाही उद्ध्वस्त झाली होती. मात्र पाण्याचा प्रश्न लक्षात घेता तातडीने येथील नळपाणी योजनेला मंजुरी देऊन २० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. योजनेचे काम चांगले व्हावे म्हणून स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन काम पूर्ण करून घेतले. त्याचा उद्घाटन लोकार्पण सोहळा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी आमदार शेखर निकम , माजी आमदार सदानंद चव्हाण , जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने , सभापती धनश्री शिंदे , जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे , संतोष थेराडे , दीप्ती महाडिक , जिल्हाप्रमुख सचिन कदम , बाळा कदम , तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे आदी उपस्थित होते