मुंबई, दि. १७: भारत जोडो यात्रा काढून राहुल गांधी यांनी संविधान वाचवण्यासाठी प्रेमाचा संदेश दिला. आजकाल तिरस्कार, द्वेषाचे राजकारण सुरू असून खोटा प्रपोगंडा राबवला जातो आहे, असा हल्लाबोल राजदचे नेतेतेजस्वी यादव यांनी भाजपवर केला.
महाराष्ट्रातील सरकारमध्ये नेते नाहीत, डीलर बसलेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नावाने मते घेतात आणि भाजपाशी डिलिंग करतात, अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी घोषणेवरून समाचार घेतला. बिहारमधील नितीशकुमार यांची गॅरंटी मोदींनी घेऊन दाखवावी, असे थेट आव्हान मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी दिले.
पक्ष फोडण्यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला जातो आहे. आमचा लढा त्यांच्याशी नाही. मात्र, ज्यांनी आजवर कधीही तिरंगा झेंडा फडकवला नाही, ते लोक देशभक्त असल्याचा कांगावा करत असल्याचा हल्लाबोल यादव यांनी केला. विरोधकांना आज धमकावले जाते. परंतु, आम्ही घाबरणारे नसून लढणारे आहोत, असे यादव यांनी ठणकावले. ऑपरेशन लोटस राबवून आमदारांसोबत डील करणाऱ्यांचे मोदी लीडर आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये आता नेते राहिले नाहीत, फक्त डिलर आहेत असा घणाघात यादव यांनी केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नावाने मते घेतात आणि भाजपाशी डिलिंग करतात, अशी टीका यादव यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात गॅरंटी देत निघाले आहेत. परंतु, मोदी म्हणजे खोटे बोलण्याची फॅक्ट्री आहेत. खोटे बोलण्याचे ते सेलर आणि होलसेलर असून आमच्या काकालाच पळवले. मोदी सर्वांची गॅरंटी देत निघाले. आता ते आमच्या काकांची (नितीशकुमार) गॅरंटी देऊ शकतात का?”, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला. तसेच बिहारमध्ये आश्चर्यकारक निकाल आणू, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, मोदींनी गेल्या दहा वर्षात रोजगार दिला नाही. मात्र, मी अवघ्या काही महिन्यांत ५ लाख लोकांना नोकऱ्या दिल्या असा दावा यादव यांनी केला.