नवी दिल्ली : देशात सुरू असलेली व्याघ्र गणना लक्षात घेत वाघांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता केंद्रीय वनमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आठवडाभर सुरू असलेल्या समारंभाच्या समारोपात ते आज बोलत होते. वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी देशभरात बालकांच्या सहाय्याने जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
तत्पूर्वी डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते वन्य प्राण्यांच्या आरोग्य आणि पोषण व्यवस्थापनासंदर्भातील एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या पुस्तिकेत उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. वन्य प्राण्यांच्या लसीकरणाबाबतचे तपशीलही यात समाविष्ट आहेत.
या समारंभात दिल्लीच्या विविध शाळांमधील 200 पेक्षा जास्त विद्यार्थी, त्यांचे शिक्षक तसेच वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारीही सहभागी झाले. देशात वाघांचे जतन करण्यासाठी भारत सरकारने 1973 सालापासून व्याघ्र प्रकल्प हाती घेतला आहे.