रत्नागिरी : रत्नागिरीतल्या कुर्धे गावात फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात वनविभागाला यश आलं आहे. आंबा कलमाच्या बागेजवळ लावण्यात आलेल्या एका फासकीत हा बिबट्या अडकला होता. या बिबट्याला जेरबंद करून सुरक्षित अधिवासात सोडण्यात आलं आहे. कुर्धे गावातील खोताची वाडी येथे एका आंबा बागेजवळ आज सकाळी एका गुरख्याला फासकीत बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गुरख्याने मालकाला या घटनेची माहिती दिली. वन विभागाला हि घटना कळविण्यात आली. त्यानंतर वणाविभाचे अधिकारी पिंजर्यासह घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. हा बिबट्या सहा वर्षांचा नर जातीचा आहे. दुपारनंतर या बिबट्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आलं.गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यामुळे ग्रामस्थ चिंतेत होते. या बिबट्याने अनेक गुरे, कुत्रे फस्त केली होती. तर तीन वेळा ग्रामस्थांवरही हल्ला झाला होता. एकदा तर बिबट्याने विहिरीतूनच पलायन केले होते. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली होते. अखेर बिबट्या जेरबंद झाल्याने गावकर्यानी सुटकेचा निःश्वास टाकला .