
मालाड, प्रतिनिधीः समाजात सांप्रदायिकतेचं विष पेरायचं आणि दुसरीकडे देश विकायला काढायचा. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसू नयेत, एवढं निर्दयी व पाषाणह्रदयी हे सरकार आहे.आजच्या रॅलीमध्ये मालाड-मालवणीमधल्या माता-भगिनी व बांधवांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग, देशातील विविध भागांमध्ये होणाऱ्या मोदी सरकार विरोधी भव्य पदायात्रा व निदर्शनं हेच ओरडून सांगत आहेत की, मोदी सरकारचा अस्त आता समीप आला आहे, असा घणाघात मुंबई शहरचे पालकमंत्री व काॅंग्रेस नेते अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर केला आहे. मंगळवारी इंधन दरवाढी विरोधात मालाड-मालवणी येथे आयोजित भव्य पदयात्रेनंतरच्या सभेत अस्लम शेख बोलत होते.
दिवसागणिक वाढत चाललेली महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भीडणारे भाव, अतिदक्षता विभागात दाखल झालेला जीडीपी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे कृषी कायदे याबाबत जाब विचारण्यासाठी काॅंग्रेस मालाड (प.) विधानसभा क्षेत्राच्या वतिने मंगळवारी भव्य पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. मालवणी-अंबोजवाडी येथे या पदयात्रेचे रुपांतर मोठ्या सभेत झाले. यावेळी अस्लम शेख व मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला.काॅंग्रेसचे हजारो कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी होत मोदी सरकार विरोधातल्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेविरोधात निकराचा लढा काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी दिला होता. आज त्याच प्रकारचा संघर्ष काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिप्रेत आहे, असे आवाहन अस्लम शेख यांनी भाषणाच्या शेवटी काॅंग्रेस कार्यकर्त्यांना केले.
काॅंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकविणारा शेतकरी मोदी सरकारला त्याच मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत देशाला सांप्रदायिक शक्तींपासून काॅंग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारच वाचवू शकतात असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी मुंबई काॅंग्रेसचे भाई जगताप, काॅंग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत, काॅंग्रेसचे युवा नेते हैदर शेख, नगरसेविका कमरजहाॅं सिद्दकी, नगरसेवक विरेंद्र चौधरी, डाॅ. नॅक्सन नाटके, धनाजी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री अस्लम शेख यांनी घेतला भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा समाचार..
अस्लम शेख यांनी भाषणात त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी भाजपाचे मुंबई अध्यक्ष लोढा यांनी मालवणी परिसराचा दौरा करुन मालवणीत हिंदू व दलितांवरती अत्याचार होत आहेत असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना ना. अस्लम शेख म्हणाले की, सर्व जाति-धर्मांचे लोक या मालवणीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गुण्या गोविंदाने नांदत आहेत. ही मालवणी म्हणजे हिंदुस्थान आहे. पण काही लफंगे मालवणीत येऊन येथील धार्मिक सलोखा बिघडवू पाहत आहेत.. अशा लोकांना कायद्याच्या भाषेत उत्तर द्यायला मी सक्षम आहे.