कर्करोगाच्या रुग्णांना कोरोनाव्हायरस होण्याचा धोका जास्त असतो. अशाप्रकारे, कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा कर्करोगाच्या रुग्णांवर परिणाम होऊ शकतो. त्याकरिता अशा रुग्णांनी घराबाहेर जाण्याचे टाळणे आणि आवश्यक त्या सर्व खबरदारीचे पालन करणे ही काळाची गरज आहे.
कोरोनाव्हायरस हे एक जागतिक संकट आहे आणि दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याचा धोका वाढत चालला आहे. कोविड -19 या विषाणुजन्य आजारामुळे श्वसन रोग होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये ते न्युमोनियास कारणीभूत ठरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीमध्ये श्वसन विकाराची लक्षणे, ताप, खोकला, श्वास घेण्यास अडथळे यांसारखी लक्षणे जाणवल्यास कोरोनाव्हायरसचा त्रास होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरसचे संक्रमण टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रत्येकाला आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.या कालावधीत कर्करोगग्रस्तांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तसेच स्वसंरक्षणाची घबरदारी घेत आवश्यक बाबींचे पालन करावे.
कर्करोग्रस्तांनी खालील बाबींचे पालन करत घ्या विशेष खबरदारी
नियमित व्यायाम : घरबसल्या देखील शारीरिकरित्या सक्रिय राहणे आवश्यक आहे. व्यायाम न केल्यास शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावण्याची शक्यता असते. शारीरीक हलचाली, व्यायाम करणे टाळल्यास स्नायू कमकुवत होणे आणि शारीरीक क्रिया मंदाविण्याची शक्यता असते. म्हणून दैनंदिन कामाला महत्त्व द्या. अचूक जीवनशैली अवलंबवण्याचा प्रयत्न करा. व्यायामामुळे आपला उत्साह कायम राखण्यास मदत होईल. व्यायामाने आपण वजन नियंत्रित राखू शकता. त्यामुळे थकवा जाणवणार नाही. परंतु कोणताही व्यायाम प्रकाराला सुरुवात करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. रुग्णाची शारीरीक कार्यक्षमता, लवचिकता, आजाराचा टप्पा या सा-या गोष्टी लक्षात घेता आपल्याला व्यायामप्रकार सुचविला जाईल. आपण घरी करू शकता असे इतर व्यायाम म्हणजे चालणे, स्नांयुना हलकासा ताण देणे योगाभ्यास करणे. मात्र जास्त प्रमाणात व्यायाम करणे देखील घातक ठरू शकते. जर आपल्याला व्यायाम करताना त्रास होत असेल तर ताबडतोब ते थांबवा आणि तज्ञांचा सल्ला घ्या.
पोषक आहार घ्या: कर्करोगाच्या रुग्णांनी संतुलित आहाराची निवड केली पाहिजे. आहारात सर्व आवश्यक पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. टोमॅटो, गाजर, भोपळा, हिरव्या पालेभाज्यांसह लोह आणि कॅल्शियमयुक्त आहार घ्या. कोबी, फ्लावर आणि ब्रोकोली सारख्या भाज्या खा. केळी, पीच, किवी, बेरी, नासपती आणि संत्री यासारख्या फळांचे सेवन करा. सी विटामिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. तेलकट, मसालेदार, प्रक्रिया केलेले, पॅकेज्ड फूड, सारखयुक्त पेयांचा वापर टाळा. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अन्नात आलं, लसूण आणि हळद घाला. भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा.
मानसिक आरोग्य सांभाळा – तुम्ही मानसिक स्वास्थ जपण्यासाठी ध्यान करा. कोरोनाव्हायरस सारख्या आजाराला घाबरू नका. विविध माध्यमातून आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्कात रहा. छंद जोपासा. वाचा, लिखाण करा, संगीत ऐका किंवा बागकाम करण्यात स्वतःला गुंतवूण घ्या. परिस्थितीला घाबरून जाऊ नका. दैनंदिन कामाचे वेळापत्रक आखा. यामध्ये आपण दिसभर करत असलेल्या कामांचा समावेश करा. रोजनिशी लिहीण्याची सवय लावा. त्यामध्ये आपले विचार आणि भावनांविषयी लिहण्याचा प्रयत्न करा.
आजारी व्यक्तींशी संपर्क टाळा – आजारी असलेल्या किंवा घराबाहेर पडणा-या व्यक्तींच्या सहवासात राहू नका. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या. वारंवार आपल्या संपर्कात येणा-या वस्तूंना स्वच्छ किंवा त्यांचे निर्जंतुकीकरण करा.
अतिरिक्त शारीरीक श्रम करणे टाळा. शरीराला पुरेशी विश्रांती घ्या.
हात न धुता आपला चेहरा, नाक किंवा तोंडाला स्पर्श करु नका.
जर तुमच्या कुटुंबातील सदस्य आजारी असतील विशेष खबरदारी घ्या. तसेच, शिंकताना किंवा खोकला असताना आपण आपले तोंड झाकले पाहिजे याचे ध्यान ठेवा. घरी पाहुण्यांना आमंत्रित करू नका. शिंकताना किंवा खोकलताना तोंड झाकण्यासाठी वापरलेला रुमाल, मास्कची स्वच्छता ठेवा. लोकांपासून 6 फूट अंतर राखणे गरजेचे आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका. चिंता वाढविणा-या बातम्या वाचण्याचे टाळा.
- आपण आपली औषधे वेळेववर घेत आहात की नाही याकडे लक्ष द्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन करू नका. –डॉ. धैर्यशील सावंत, सिनियर सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी