रत्नागिरी : केवळ रत्नागिरीचीच नव्हे तर कोकणचं नाव सांस्कृतिक विश्वात भारतभरात पोहोचवणारा रत्नागिरीतील ‘थिबा राजवाडा संगीत महोत्सव’ येत्या 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी होणार आहे. रत्नागिरीतल्या ‘आर्ट सर्कल’संस्थेकडून या महोत्सवाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. शास्त्रीय संगीताची स्वर्गीय अनुभूती आणि राजवाड्याची भव्यता हा संगम निव्वळ शास्त्रीय संगीत प्रेमींनाच नव्हे तर आबालवृद्धांना मोहात पाडतो. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी या महोत्सवाला हजेरी लावलेली आहे. यावेळीही या महोत्सवाला प्रतिभावान कलाकार लाभले आहेत. विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर या जगप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने यंदाचा महोत्सव सजाणारच आहे पण नवोदितांच्या उपस्थितीनेही रंगणार असल्याची माहिती आर्ट सर्कलकडून देण्यात आली आहे.
24 जानेवारीला डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांच्या भरतनाट्यम नृत्य कीर्तनाने या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
या नृत्यकीर्तन मध्ये सरस्वती सुब्रमण्यम गायन साथ, अतुल शर्मा बासरी साथ, आणि सतीश कृष्णमूर्ती मृदुंग साथ करणार आहेत. नृत्यकीर्तन नंतर लगेचच विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. अजय जोगळेकर संवादिनी साथ तर मंगेश मुळ्ये तबला साथ करणार आहेत. जयपूर अत्रौली घराण्याच्या अध्वर्यू असलेल्या विदुषी श्रुती सडोलीकर महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप करणार आहेत.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ महाराष्ट्रातील आश्वासक युवा गायिका मुग्धा वैशंपायन हिच्या गायनाने होणार आहे. लिटिल चॅम्प्स च्या मंचावरून घराघरात पोहोचलेली मुग्धा आज शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नवीन पिढीतील आश्वासक कलाकार आहे. सुप्रसिद्ध वादक अनंत जोशी मुग्धाला संवादिनी संगत तर स्वप्नील भिसे तबला संगत करणार आहेत.
त्या नंतर लगेचच संतूर वादक संदीप चॅटर्जी, बासरी वादक संतोष संत, तबला वादक पं. रामदास पळसुले आणि पखवाज वादक पं. भवानीशांकर यांची जुगलबंदी रंगणार आहे.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी अर्थात दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुरुवातीला विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे *स्त्री ताल तरंग -लय राग समर्पण*! घटम सारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर घटम वादक सुकन्या रामगोपाल यांनी जबरदस्त प्रभुत्व प्राप्त केलं आहे. भारतातील त्या पहिल्या स्त्री घटमवादक आहेत. वेगवेगळ्या श्रुतीचे 6 ते 7 घटम एकत्र ठेवून त्यातून अप्रतिम तालनिर्मिती करणारा *घटतरंग* हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सर्व वादक स्त्री कलाकार आहेत.
तर महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ कलाकार पं. उल्हास कशाळकर करणार आहेत. त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अशा तीनही घराण्याची गायकी आत्मसात केलेली आहे. जगभरातले उत्तमोत्तम मानसन्मान पं. कशाळकर यांना लाभले आहेत..