रत्नागिरी : रत्नागिरीतील ऐतहासिक थिबापॅलेसच्या नूतनीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी सध्या बंद आहे. मे महिन्याच्या सुटीसाठी हजारो पर्यटक थिबा राजवाडा पाहण्यासाठी रत्नागिरीत येतात; मात्र जिन्याची दुरुस्ती रखडल्यामुळे हा ऐतिहासिक राजवाडा त्यांना पाहता येत नाही. निधीअभावी काम रखडल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगितले जाते. तळमजल्यावरील म्युझियममधील काही जुन्या वस्तू तेवढ्याच पाहता येतात. गेल्या चार वर्षात कोट्यवधी रुपये खर्चूनही कामे अपूर्ण राहिली आहेत.या राजवाड्यावर शासनाकडून २ कोटी १७ लाखाचा निधी खर्च केला जात आहे. या राजवाड्याच्या नूतनीकरणाचे काम करणाऱया ठेकेदाराला १ कोटी ४८ लाख रुपये देय झालेले असल्याचे सांगण्यात येत आहे. राजवाड्याच्या अंतर्गंत कामापैकी दोन जिन्यांची कामे अजूनही बाकी आहेत. त्यामुळे आतमध्ये पर्यटकांना हा राजवाडा पाहण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र यावेळी येथील वस्तूसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले असल्याचे पुरातत्व विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.