मुंबई : मुंबईला बॉलिवूडची नगरी म्हटले जाते. मुंबई आणि महाराष्ट्र ही भारतीय सिनेमाची जन्मभूमी आहे. इथे नाटकांना प्राधान्य दिले जाते. समाजाच्या मनातील प्रतिबिंब हे नाटकाच्या माध्यमातून थिएटरमध्ये दाखविले जाते. चित्रपट उद्योगात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झाले तरीही थिएटरला कोणीही समाप्त करू शकणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने आयोजित आठव्या थिएटर ऑलिम्पिक्स समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कामगार क्रीडा भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक कार्य, पर्यावरण, वन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, थिएटर ऑलिम्पिक्स थिएटर कमिटीचे अध्यक्ष थिओडोरस तेरझोपौलस, सदस्य रतन थियाम, थिएटर ऑलिम्पिक्स २०१८ चे सल्लागार समितीचे अर्जुन देव चारण, अभिनेता नाना पाटेकर, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, संचालक वामन केंद्रे यांची उपस्थिती होती.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राम गणेश गडकरी यांनी सादर केलेले ‘एकच प्याला’ हे नाटक अजरामर झाले. महाराष्ट्रात मराठी मन नाटकावर बसलेले आहे. केंद्रीय राज्यमंत्री श्री.शर्मा म्हणाले की, थिएटर ऑलिम्पिक्सच्या माध्यमातून भारतीय संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. भारत विविधतेने नटलेला देश असून भारतीय संस्कृतीमुळेच तो एकसंघ असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविक वामन केंद्रे यांनी केले तर समारोप अर्जुन देव चारण यांनी केला.