मुंबई : दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे चिंरजीव शशांक राव आणि म्युनिसिपल मजदूर युनियन संघाचे महाबळ शेट्टी, अध्यक्ष सुखदेव काशीद यांच्यातील वाद उफाळून आल्यानंतर प्रमुख नेते शशांक राव यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एकत्र येत राव यांच्या नेतृत्वाखाली आज द म्युनिसिपल युनियन या नवीन संघटनेची स्थापना केली. परळ डॉ. शिरोडकर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात स्थापनेची घोषणा करण्यात आली. शांता राव (स्व.शरद राव यांच्या पत्नी) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन नवीन संघटनेचा शुभारंभ करण्यात आला. आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विविध युनियनचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आणि कर्मचारी-अधिकारी यांनी हॉल खचाखच भरला होता.
म्युनिसिपल मजदूर युनियन मधील वाद विकोपाला पोहोचल्यानन्तर कामगार आणि कर्मचारी यांत संभ्रम पसरला होता. अनेक कामगार शशांक राव यांच्याकडे गेले आणि त्यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, नव्या युनियनची स्थापना करा, अशी मागणी केली. कामगारांनी केलेल्या आवाहनानंतर नव्या युनियनची मोठया उत्साहात स्थापना करण्यात आली.