माणगाव येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ संपन्न
अलिबाग (जिमाका) दि.09 :राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. माणगाव येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या “माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. या योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता 7 ते 12 मार्च दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी कु.तटकरे यांच्या हस्ते माणगाव पंचायत समिती येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग माणगाव कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. यासोबतच ढालघर फाटा ते वावे रोहिदासवाडी रस्त्याचे लोकार्पण, लोणशी मोहल्ला ईदगाह मैदान संरक्षक भिंत कामाचे उद्घाटन आणि लोणशी बौद्धवाडी येथे सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास लोणशी सरपंच सिद्धेश पालकर, उणेगाव सरपंच शुभांगी शिर्के, होडगाव सरपंच बळीराम खाडे, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, हुसेन रहाटविलकर, लोणशी उपसरपंच मच्छिंद्र म्हस्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालविकास) निर्मला कुचिक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कु.तटकरे म्हणाल्या, “तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. टप्पा दोन अंतर्गतही नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येतील. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ माणगाव तालुक्यावर येऊ नये यासाठी आवश्यक निधी मंजूर करून विकासकामे वेळेत पूर्ण केली जातील.तसेच, लोणशी ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामे करण्यात आली असून उर्वरित कामेही लवकरच मार्गी लावली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.