रत्नागिरी, ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाबाबत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर केंद्राच्या महाराष्ट्रातील विभागीय अधिकार्यामार्फत कामाची पाहणी करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी अधिकार्यांना दिले.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण व भूसंपादनाच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून), महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर, सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दिपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, प्रधान सचिव, केंद्राचे तसेच राज्य शासनाचे अधिकारी, जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम टेंडरमधील अटी व शर्तीनुसार करण्यात येत नसून, कंत्राटदाराकडून या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी निदर्शनास आणले. कंत्राटदार टेंडरमधील नियमांनुसार काम करीत नसल्याने या महामार्गावर निव्वळ कंत्राटदाराच्या चुकीमुळे काही जणांना आपले जिव गमवावे लागले आहे. याला जबाबदार कोणाला धरायचे?, असा प्रश्नही वायकर यांनी या बैठकीत उपस्थित केला. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना या महामार्गावरील तोडण्यात आलेली अनेक झाडे महामार्गाच्या इतरत्र टाकण्यात आली आहे. परंतु कंत्राटात नमुद असतानाही या महामार्गावर कंत्राटदाराने एकही झाड लावले नाही. इलेक्ट्रीकचे तोडण्यात आलेले पोलही अद्याप बसविण्यात आलेले नाही, असे वायकर यांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणले. मागील वर्षीही या कंत्राटदाराने या महामार्गावरील खड्डेही न बुजविल्याने या महामार्गावरुन प्रवास करणार्या वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा. यंदाही तीच परिस्थिती असल्याचेही वायकर यांनी नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरीकरणाचे काम करताना सुमारे ४० हजार झाडे तोडण्यात आल्याची माहिती महामार्गाच्या अधिकार्यांकडून देण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम एका बाजुने पुर्ण झाले आहे, त्या ठिकाणी तात्काळ झाडे लावण्यात येतील, असे आश्वासन महामार्गाच्या अधिकार्याने दिले. त्याचबरोबर चौपदरीकरणाचे काम करणार्या कंत्राटदाराकडून अटी व शर्तीनुसार काम करण्यात येत नसल्याने याची केंद्राच्या महाराष्ट्रातील विभागीय अधिकार्याकडून पहाणी करुन सात दिवसात त्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना चंद्रकात दादा पाटील यांनी संबंधित अधिकार्याला दिल्या. गणेशोत्सवापुर्वी ५ सप्टेंबरपर्यंत या महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली.