
मालाड, ता. १८ (निसार अली ) : सालाबादप्रमाणे मढ कोळीवाड्यातील किल्लेश्वर भजन मंडळ यांची मढ-मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी यात्रा दिनांक 17 जून रोजी, श्री किल्लेश्वर मंदीर येथून रवाना झाली. या वेळी गाव परंपरेनुसार श्री हरबादेवी (ग्रामदेवी) मंदीर ट्रस्टच्या वतीने शुभेच्छा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी वारी संस्थापक भजन मंडळ सदस्यांनचा सत्कार करण्यात आला. दिवंगत संस्थापक नारायण बावकर बुवा व संस्थापक सदस्य देवनाथ कोळंबी बुवा यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सरचिटणीस किरण कोळी यांनी वरिष्ठ वारक-यांच्या मार्गदर्शनाखाली पायी ग्रुप मध्ये चालत चला आणि पुढच्या हंगामात कोळी बांधवांना चांगली मासळी मिळण्यासाठी तथा एलईडी पर्ससीन नौकांवर शासन कारवाई करण्यासाठी सरकारी अधिका-यांना सदबुध्दी देण्यासाठी पांडुरंगाला साकडे घाला. विभागातील जनता आपल्या बरोबर आहेत. अशा शुभेच्छा दिल्या. तर समारोपाचे भाषण ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील यांनी करत शुभेच्छा देऊन आभार मानले. याप्रसंगी प्रभारी नगरसेविका संगीता संजय सुतार, समाजसेवक संजय सुतार, मढ दर्यादीप मच्छिमार सह. संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कोळी, डाॅ. नॅक्सन नाटके, धनाजी कोळी, विवेक कदम, ॲड. विक्रम कपूर, किल्लेश्वर मंदीर ट्रस्ट अध्यक्ष मधूकर पूरव, डाॅ. प्रकाश तिवारी, हरबादेवी मच्छिमार संस्था सचिव दिपक वासावे, शाखा प्रमुख (उबाठा) संदेश घरत इत्यादींने शुभेच्छापर भाषणे केली. सूत्रसंचालन ट्रस्ट सचिव संतोष कोळी यांनी केले. तर भजन मंडळाच्या वतीने लक्ष्मन येरु यांनी आभार मानले. त्यानंतर गावातून दिंडी सुरु झाली. दिंडी भाटी गावात भाटी मच्छिमार संस्थेंने अध्यक्ष राजीव दुमिंग कोळी यांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या, सुखाने जा आणि सुखाने या असा हरीनाम गजरात निरोप दिला.

