
रायगड-अलिबाग,दि.06 :- बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान रायगड वार्षिक क्रियाकलाप अहवाल 2024-2025 कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते (दि. 25 सप्टेंबर 2025) रोजी संपन्न झाला.
यावेळी बँक ऑफ इंडिया रायगड विभागाचे प्रमुख सौ. दिपानविता सहानी (बोस), जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान रायगड विभागाच्या प्रकल्प अधिकारी सौ. प्रियदर्शनी मोरे, नाबार्डचे जिल्हा विभाग व्यवस्थापक प्रदीप अपसुंडे, रायगड जिल्हा औद्योगिक केंद्राचे जनरल मॅनेजर जी. एस. हरळया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी विशाल गोंदके, संस्थेचे संचालक सुमीकुमार धानोरकर तसेच संस्थेचे कर्मचारी व रायगड जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी- कर्मचारीउपस्थितहोते.
यावेळी संस्थेचे संचालक सुमितकुमार धानोरकर म्हणाले की, महिलांनी फक्त गृहिणी न राहता स्वरोजगाराकडे वळावे त्यासाठी बँक ऑफ इंडिया आणि आरसेटी पूर्णपणे सज्ज आहे. व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर व्हावे तसेच लहान लहान कामातून मोठी सुरुवात करता येईल आणि त्यातून महिला उद्योजिका निर्माण होतील असे आश्वासन दिले. महिलांनी उत्तम प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. प्रशिक्षणादरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थींना कौशल्य विषयी संपूर्ण ज्ञान या सोबत उद्योजकीय सक्षमता, संवाद कौशल्य, मार्केटिंग, ध्येय निश्चिती व जोखीम विश्लेषण, आत्मविश्वास बांधणी, बँकिंग, कर्ज अशा विविध विषयांबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येते सोबतच प्रशिक्षणादरम्यान लागणासाहित्य, चहा, नाश्ता आणि जेवणाची मोफत सोय करण्यात येते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
















