मालाड, ता.9 (वार्ताहर) : बॉम्बे कॅथलिक सभा, संविधान जागर समितीच्या वतीने मुंबईसह ठाण्यात विविध ठिकाणी दिवंगत मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना आदरांजली वाहण्यात आली. बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, वांद्रे, माहीम,विक्रोळीसह ठाण्यात 20 ठिकाणी चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन बॉम्बे कॅथलिक सभेच्या वतीने करण्यात आले. तसेच फादर स्टॅन स्वामी यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर बॉम्बे कॅथलिक सभा आणि इतर संस्था यांनी हातात फलक घेऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून शांतीपूर्ण निदर्शने केली. आंदोलकांनी युएपीए कायदा रद्द करण्याची मागणी केली. तसेच फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी बॉम्बे कॅथलिक सभा अध्यक्ष रफाईल डिसोझा यांनी केली.















