नागपूर : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या मेट्रो मार्ग 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) च्या मार्गिकेलगतच्या जागेवरील बांधकामासाठी ‘एमएमआरडीए’चे ना हरकत प्रमाणपत्र न घेता बांधकाम परवानगी दिल्या प्रकरणाची चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश ‘एमएमआरडीए’ला देण्यात येत असल्याचे व याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत आज सांगितले.
विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, मेट्रो मार्गिकेलगतच्या जागेवर बांधकाम सुरू करण्यापूर्वी एमएमआरडीएकडून ना हरकत दाखला प्राप्त करणे आवश्यक आहे. मात्र, मेट्रो 5 च्या मार्गिके लगतच्या बांधकामांना ना हरकत दाखला न घेता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत परवानगी देण्यात आली असल्याचे निर्दशनास आले आहे. या प्रकरणी ‘एमएमआरडीए’कडून चौकशी अहवाल मागविण्यात येणार आहे. या प्रकरणी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.
या सूचनेवरील चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, भाई जगताप, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला