ठाणे : डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापूर येथील कुणबी महोत्सवात ठाणे जिल्हा परिषदेने मुरबाड-शहापूर भागात उत्तम टुरिझम सर्किट तयार करावे असे सांगितले होते. जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी रुजू होताच यादृष्टीने पावले उचलली आहेत. माळशेज परिसरातील नाणेघाट, वाल्हीवरे, सावर्णे, थितबी इत्यादी ठिकाणी संपूर्ण सुविधायुक्त पर्यटन स्थळे विकसित करणार असल्याचे ठरविले आहे. त्यांनी या संपूर्ण भागाचा दौरा करून विशेषत्वाने ॲडव्हेंचर ट्रेकिंग पॉईंटससाठी सुविधा उपलब्ध करून गावकऱ्यांच्या सहभागातून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची योजना आखली आहे.
हा पर्यटन स्थळांचा विकास कोंकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत केला जाणार असून यासर्व ठिकाणी विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहे, चेंजींग रुम्स, टेन्टस, डॉरमेंटरी, जोडरस्ते, अॅडव्हेंचर ट्रेकींगसाठी सुविधा, माहिती केंद्र इत्यादींसारख्या आवश्यक सुविधा असतील. यासाठी सुमारे साडे आठ कोटी रुपये निधी ग्रामविकास विभागाने उपलब्ध केला आहे.
विशेष म्हणजे पर्यटकांना आवश्यकतेनुसार योग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक महिला बचत गट, ग्रामसंघ,युवक मंडळे, इ. घटकांचा सहभाग घेऊन त्याना पायाभूत व कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी स्थानिक वस्तू व उत्पादने विक्रीसाठी बचत गटांना स्टॉल्स सुद्धा उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार असून स्थानिक लोकांना शाश्वत स्वरुपात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्याचा सर्वंकष पर्यटन विकास आराखडा करण्यात येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, ॲडव्हेंचर ट्रेकींग, ॲग्रोटूरिझम,इत्यादी सर्व घटकांचा प्रामुख्याने समावेश करण्याचेही त्यांचे नियोजन आहे.
यामध्ये प्रामुख्याने माळशेज परिसर, सिद्धगड, माहुली किल्ला, अजा पर्वत, इत्यादी अनेक ऐतिहासिक व प्रेक्षणिय स्थळांचा समावेश करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, गटविकास अधिकारी ऐस्ताज हाश्मी, तहसिलदार सर्जेराव म्हस्के पाटील, सहाय्यक वनसंरक्षक कुंभार,सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश मोहिते, परिक्षेत्र वन अधिकारी चन्ने, हिरवे इत्यादी अधिकारी उपस्थित होते