ठाणे : ठाणे सिटी एफ सी संघाने श्री माँ गुरुकुल संघाचा ४-० असा फडशा पाडत विफा ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या प्रभारी समिती आयोजित ठाणे फुटबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली. विजेत्या संघाच्या दर्शन शेट्टीने सामन्याच्या सुरुवातीलाच ३ ऱ्या आणि १३ व्या मिनिटाला गोल करत संघाला समाधानकारक आघाडी मिळवून दिली. या आघाडीत आदित्य पगारने १६ व्या मिनिटाला गोल करत भर टाकली. विनय तावडेने ३७ व्या मिनिटाला गोल करत संघाला आणखी बळकटी मिळवून दिली. पराभूत संघाच्या आक्रमकांनी काही चांगल्या चाली रचल्या. पण गोल करण्यात त्यांना यश मिळाले नाही.
अन्य लढतीत लायकांस संघाने यंग गन्स संघाचा 2-१ असा पराभव केला. पियुष मिश्राने खेळातील २ ऱ्या मिनिटालाच लायकांस संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हल्ले प्रतिहल्ले चढवत गोल करण्याचे प्रयत्न केले. त्यात सौरभ मिश्राला ४७ व्या मिनिटाला संघाच्या आघाडीत भर टाकण्यात यश आले. पराभूत संघाचा एकमेव गोल सुमितने ५८ व्या मिनिटाला नोंदवला. एफएलए श्री माँ संघाने प्रहार युनायटेड संघाचा ७-१ असा धुव्वा उडवला. विजयी संघाच्या अनंत आणि एल्टनने प्रत्येकी दोन गोल केले. तर एर्रोन, सात्विक आणि अखिलेशने प्रत्येकी एक गोल केला. आनंद भारती समाज आणि सहारा बॉईज एफ सी या संघातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली.