ठाणे : शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या सामन्यात मौर्य यंगस्टर्स संघाने अंजुमन एफ सी संघाचा २-१ असा पराभव करत विफा ठाणे जिल्हा फुटबाल संघटनेच्या प्रभारी समितीतर्फे आयोजित पहिल्या ठाणे फुटबाल लीग स्पर्धेत पहिल्याच सामन्यात विजयाचे खाते खोलले. सामन्याच्या पहिल्या सत्रात अबुझीरने गोल करत अंजुमन संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या मधल्या खेळात राहुल मथ्यूने गोल करत मौर्य यंगस्टर्स संघाला बरोबरी साधून दिली. बरोबरीची हो कोंडी सामना संपायला ५ मिनिटे शिल्लक असेपर्यंत कायम होती. सामन्याच्या शेवटच्या मिनिटामध्ये साहिल मुखर्जीने निर्णायक गोल करत मौर्य यंगस्टर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंब्रयातील मौलाना अब्दुल कलाम आझाद फुटबाल स्टेडीयममध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात मर्सियन एफ सी संघाने मुंब्रा युनायटेड संघाचा ५-२ असा पराभव केला. साहिलने ४ गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. संघाचा पाचवा गोल रजतने केला. पराभूत संघाकडून मुझाम्मील आणि आमिरने प्रत्येकी एक गोल केला. अन्य लढतीत स्पोर्टिंग क्लब दे ठाणे संघाने मुंब्रा एफ सी संघाचा १-० असा पराभव करत पहिला विजय मिळवला. या सामन्यात अलिस्तेअर फार्नादेसचा गोल निर्णायक ठरला. सुमारे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ठाण्यात सुरु झालेल्या या लीगमधील सामने शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवशी खेळवण्यात येणार आहेत. हि लीग स्पर्धा सुमारे दोन महिने रंगणार आहे.