ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७३.१३ टक्के पाउस झाला असून धरणांमध्ये देखील ७३.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनी संबंधित यंत्रांच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत, असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सांगितले.मोडकसागर धरणाचे ५ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे कालच (रविवार) उघडण्यात येऊन त्यातून विसर्ग सुरु झाला आहे. सध्याचा धरणसाठा आणि (मागील वर्षी) याच सुमारास असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे: भातसामध्ये ६३.९६ टक्के(६६.८१ टक्के), मोडकसागर १०० टक्के, ( १०० टक्के), तानसामध्ये ९२ टक्के ( ८६.१५ टक्के), बारवीमध्ये ८२.१९ टक्के (७३.७६ टक्के) पाणीसाठा आहे.तानसा धरण येत्या दोन दिवसांत भरून वाहू लागेल अशी परिस्थिती आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्याची प्रक्रिया होईल.ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ५११.८२ मिमी पाउस झाला असून ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याण मध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के. भिवंडीमध्ये ८५.१४ टक्के, शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाउस झाला आहे.