
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणावरून दुचाकीच्या डिकीतून साडेतीन लाखांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती मंदिर परिसरात ही घटना घडली होती. दरम्यान हि चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. आंबा व्यापारी संजय मुळे यांच्या घरी जगन्नाथ जंगम हे कामाला आहेत. त्यांच्या घरी भाजीपाला आणणे, बँकेतून पैसे काढणे ही कामे ते करतात. सोमवारीही संजय घाग यांनी जंगम यांच्याकडे 3 लाख 50 हजार रुपयांचा चेक देवून बँकेतून पैसे काढण्यास सांगितले होते. आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढून बाहेर आपल्यावर ते भाजीपाला घेण्यासाठी मारुती मंदिर परिसरात आले. आणि शिवाजी स्टेडियम बाहेरच्या भाजीवाल्याकडे भाजी घेण्यासाठी गेले होते. दरम्यान याचवेळी दोन दुचाकिवरून चार जण त्यांचा पाठलाग करत होते. जंगम हे भाजी घेण्यास गेले, मात्र दुचाकीची चावी काढून घेण्यास ते विसरले. जंगम भाजी घेण्यात गुंतलेले असताना याच संधीचा फायदा उठवत त्यांच्यामागून येणार्या दुचाकीवरील संशयित आरोपींनी दुचाकीच्या डिकीतील साडेतीन लाख रुपयांची रोकड लांबवली. डिकितील पैसे चोरीस गेल्याचे लक्षात येताच जंगम यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. हा चोरीचा सर्व प्रकार तेथील एका दुकानाच्या सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या फुटेजमध्ये तीन संशयित आरोपी दिसत आहेत. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे शहर पोलिस तपास करत आहेत.















