मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडूप पंम्पिंगजवळ भरधाव वेगात असणार्या एका टेम्पोचा टायर फुटून तो पलटला. या अपघातात चालक फकीरअप्पा शांताप्पा मिस्त्री (५०) ठार झाला. ठाण्याकडून मुंबईकडे लोखंडी ठोकळ्यांनी भरलेला टेम्पो जात होता. आज गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान हा अपघात घडला. टेम्पोचा क्रमांक एमएच ०४- एफजे ४४१४ हा आहे.
टेम्पो पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूप पंम्पिंगजवळ आला असता अचानक टेम्पोच्या डाव्या बाजूकडील मागचा टायर फुटला. टेम्पो द्रुतगती मार्गावर पलटी झाला आणि टेम्पोचा वरचा भाग चक्काचूर झाला.
अपघातात चालक गंभीर जखमी झाला होता. येथून जाणार्या प्रवाशांनी १०८ या रुग्णवाहिका क्रमांकाला आणि पोलिसांना माहिती दिली. त्वरित जखमी चालकाला विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तो मरण पावला. अपघातामुळे एक तास पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.