रत्नागिरी, ( आरकेजी) : भारतीय रेल्वेची शान असलेली आणि सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला चिपळूणात थांबा मिळावा म्हणुन रेल्वे मंत्रालयालाच साकडं घालण्यात आलं आहे. खासदार विनायक राऊत यांनी पत्राद्वारे रेल्वेमंत्रालयकडे हि मागणी केली आहे.
बहुचर्चित तेजस एक्स्प्रेसला चिपळूणात थांबा मिळावा अशी चिपळूणकरांची मागणी होती. रत्नागिरी जिल्ह्यात तेजस एक्स्प्रेसला फक्त रत्नागिरीत थांबा देण्यात आला होता. पण जिल्ह्यातले प्रमुख रेल्वेस्टेशन असलेल्या चिपळूणमध्ये मात्र या एक्सप्रेसला थांबा देण्यात आला नव्ह्ता, याबाबत स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता सिंधुदुर्ग -रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनीच यामध्ये आता लक्ष घातलं आहे. मुंबई ते गोवा धावणाऱ्या या आलीशान एक्स्प्रेसला येताना आणि जाताना चिपळूण रेल्वे स्थानकावर हा थांबा देण्यात यावा अशी विनंती खासदार विनायक राऊत यांनी एका पत्राद्वारे रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे कोकणातले असल्यानं प्रभूंची कृपा चिपळूणवासीयांवर होते का हे पहाणे उत्सुकतेचं असणार आहे. मात्र शिवसेना खासदारांनी मागणी केल्यानंतर तेजस एक्स्प्रेसला चिपळूणात थांबा दिला नाही तर आंदोलन कऱण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. दरम्यान तेजसला चिपळूणात थांबा देण्यासाठी रेल्वे मंत्रालय अनुकुल असल्याची माहीती सुत्राकडून मिळाली आहे.