रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आलीशान अशा तेजस एक्स्प्रेसला अखेर चिपळूण रेल्वे स्टेशनमध्ये थांबा मिळाला. मुंबईहून मडगावच्या दिशेने आज धावलेली तेजस एक्प्रेस चिपळूण स्टेशनमध्ये थांबवण्यात आली. चिपळूणात आलेल्या तेजसचे प्रवासी संघटनाकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. गेले कित्येक दिवस कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला चिपळूण स्टेशनमध्ये थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. अखेर हि मागणी कोकण रेल्वे प्रशासनानं मान्य केली. यासाठी खासदार विनायक राऊत आणि कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीनं जोरदार प्रयत्न केले होते.तेजस एक्सप्रेसला कोकणात केवळ रत्नागिरी आणि कुडाळ हे केवळ दोनच थांबे देण्यात आल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे या गाडीला कणकवली तसेच तीन औद्योगिक वसाहती असलेल्या चिपळूणमध्ये देखील तेजसला थांबा मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यातच चिपळूण हे कोकणातील महत्वाचं रेल्वे स्थानक आहे. तसेच मुंबई किंवा गोव्यावरून पश्चिम महाराष्ट्रातील पाटण इथे जाणारे अनेक प्रवासी चिपळूणला उतरतात आणि पुढचा प्रवास करतात. कारण चिपळूणवरून त्यांना जवळ पडतं. त्यातच गुहागर, परशुराम देवस्थान अशी अनेक पर्यटन स्थळे चिपळूणपासून जवळ आहेत. त्यामुळे चिपळूणला थांबा मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. अखेर आजपासून चिपळूणात तेजस एक्सप्रेसला थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार आपल्या नियोजित वेळेनुसार सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी तेजस एक्सप्रेस चिपळूनात आली. यावेळी कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम यांनी गुलाब पुष्प देऊन रेल्वे अधीकारी आणि प्रवाशांचे स्वागत केले. यावेळी स्टेशन मास्टर अशोक पाटील,किशोर नारकर ,महेश पवार आदी उपस्थित होते