रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्सप्रेसमधे २० प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या प्रवाशांवर चिपळूणमधील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
देशातील वेगवान एक्स्प्रेस म्हणून तेजस एक्स्प्रेस ओळखली जाते. करमाळीहून दर रविवारी ती मुंबईच्या दिशेने धावते. आजही तेजस एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेनुसार करमाळीहून सुटली. दरम्यान या एक्सप्रेसमधील काही प्रवाशांनी अन्नपदार्थ खाल्ले होते. काहींनी सुप आणि आमलेट खाल्ले होते, असं सांगितलं जाते. यानंतर अचानक या प्रवाशांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. त्यामुळे ही गाडी चिपळूण रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. प्रवाशांना तातडीने अँब्युलन्सने चिपळूणमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही प्रवाशांवर लाईफ केअर मध्ये उपचार सुरु आहेत. या प्रवाशांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे. या गाडीत कँटरींगचं कंत्राट हे आयआरसीटीसीकडे आहे.