रत्नागिरी : आगामी काळात होणार्या शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग बेरोजगार संघटनेच्या शिष्टमंडळासह डीएड्, बीएड् धारकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.जिल्हाभरातून मोठ्या संख्येने डीएड्, बीएड् धारक या उपोषणात सहभागी झाले होते. मागील आठ वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. शिक्षक भरती सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच गुण वाढवून देण्याच्या रॅकेटने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सन 2010 प्रमाणे आताच्या भरतीतही गैरप्रकार घडत असून गुण वाढवून देण्याबाबतचे संभाषणही व्हायरल झाले आहे. या रॅकेटची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आम्ही परजिल्ह्यातील उमेदवारांना रूजू करून घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकाला न्याय मिळाला की, जिल्हा बदल्यांचा प्रश्नच येणार नाही. २०१० पूर्वी जशी जिल्हा स्तरावर भरती होत होती, तशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना देण्यात आले. शासनाकडे आपल्या मागणी पोहचवू, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले. यावेळी अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्ष कल्पेश घवाळी, सचिव संदेश रावणंग, सल्लागार दीपक भरणकर, प्रभाकर धोपट उपस्थित होते.उपोषणाला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, जि.प. अध्यक्षा स्नेहा सावंत, शिक्षण सभापती दीपक नागले, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव, स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला. खा. विनायक राऊत, माजी खासदार नीलेश राणे, आमदार राजन साळवी, आमदार निरंजन डावखरे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची भूमिका असून न्याय मिळेपर्यंत लढा देणार असल्याचे आश्वासन यावेळी उपोषणकर्त्यांना देण्यात आले.शिक्षक समितीचे अरविंद जाधव, प्रभाकर खानविलकर आणि शिक्षक संघाचे दिलीप देवळेकर, संतोष रावणंग यांनीही शिक्षक संघटनांचा आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही १४,१५,१६, मे रोजी उपोषण करण्यात येणार आहे.